मुलींच्या नावाची लागणार घरावर पाटी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 January 2020

नंदुरबार : मुलगी आणि मुलाबाबत समाजात आजही केला जाणारा भेदभाव पुरोगामी महाराष्टातून नष्ट व्हावा, स्री शिक्षणाबाबत जागर व्हावा आणि मुलगा व मुलगीला समान मानण्यात यावे यासाठी शासन राबवित असलेल्या विविध उपक्रमात आता शिक्षण विभागालाही सहभागी करून घेण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या नावाची पाटी त्यांच्या घरावर लावण्यात येणार आहे. जिल्ह्यात या उपक्रमाला सुरवात झाली असून यामुळे मुलींबाबत सामाजिक मानसिकता बदलण्यास मदत होणार आहे. 

हेही पहा - मुली असलेल्या कुटूंबाचा, गावांचा होणार सत्कार

मुलींबाबत समाजात होणाऱ्या भेदभावाच्या वर्तणुकीमुळे मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातून त्यांचे मानसिक खच्चीकरण होते आणि त्या शिक्षणापासूनही लांब राहतात. घरीदारीही तु मुलगी आहे, सासरी तर जाणार आहे, अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे तिचे सामाजिक स्वास्थ्यही धोक्यात येते. अनेकदा यामुळेच शिक्षणातून होणारी गळती थांबावी आणि मुलींमध्ये आत्मविश्‍वास वाढीस लागावा यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या घरावर तिच्या नावाची पाटी लावण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी (प्रा) बी.आर. रोकडे यांनी शासनाच्या सूचनेनुसार काढले आहेत. 

आत्मविश्‍वास निर्माण होण्यास... 
यानुसार प्रत्येक तालुक्यातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती, विषयतज्ज्ञ तसेच मुख्याध्यापकांतर्फे विद्यार्थीनीच्या घरावर तिचे संपूर्ण नाव, पत्ता, शाळेचे नाव (सोबत एखादे घोषवाक्य असे रंगीत पाटी अथवा कार्डशीटवर लावावी. जेणेकरून मुलींची उपस्थिती वाढण्यास आणि त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण होण्यास मदत होईल. हे घर आपले आहे, आपल्याला कुणाचातरी आधार आहे ही भावना त्यांच्यात निर्माण होण्यास ही कृती सहाय्यकारी ठरणार आहे. 

रनाळे जि. प. शाळेतर्फे सुरवात 
रनाळे खुर्द येथे जिल्हा परिषद शाळेतर्फे सर्व विद्यार्थिनींच्या घरावर विद्यार्थिनींच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. नाव, इयत्ता, शाळेचे नाव व महिला शिक्षण व सक्षमीकरण अंतर्गतचे मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण, मुलगा मुलगी एक समान अशी घोषवाक्य त्यावर आहेत. मुख्याध्यापक पंकज भदाणे यांच्या हस्ते आज रनाळे खुर्द गावात शाळेतील मुलींच्या नावाची पाटी लावण्यात आली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar zp school doughter name plate house