नरडण्यातील तीन खुनांची उकल होणार ? की..

लोटन चौधरी
Tuesday, 8 December 2020

मुंबई-आग्रा महामार्ग व पश्चिम रेल्वे मार्गावर नरडाणा गाव असल्याने अवैध व्यवसायांचा सुळसुळाट आहे. पोलिस अर्थपूर्ण कारणांसाठी महामार्गावर थांबलेले दिसून येतात.

सोनगीर : अवैध व्यवसाय आता जनतेच्याही अंगवळणी पडले असून, नवीन कोणी अधिकारी बदलून आला तरी हे व्यवसाय बंद होणार नाहीत, हे जनतेच्या पचनी पडले आहे. किमान गंभीर गुन्ह्यांवर आळा घालण्याची अपेक्षा नवीन पोलिस अधिकाऱ्यांवर असते. 

नरडाणा पोलिस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक योगेश राजगुरू यांच्या जागी मनोज ठाकरे बदलून आले आहेत. तीन खुनांचे गुन्हे अनेक महिन्यांपासून उघडकीस आले नाहीत. आता सहाय्यक निरीक्षक ठाकरे गुन्ह्यांची उकल करतात की फाइल बंद होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. 

वाचा- थरारक..दुचाकीवर मागून येत पिस्‍तुल काढली आणि पाच मिनिटात खेळ खल्‍लास

मुंबई-आग्रा महामार्ग व पश्चिम रेल्वे मार्गावर नरडाणा गाव असल्याने अवैध व्यवसायांचा सुळसुळाट आहे. पोलिस अर्थपूर्ण कारणांसाठी महामार्गावर थांबलेले दिसून येतात. नवीन अधिकाऱ्यांनी अवैध व्यवसाय व त्याला खतपाणी घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर वचक ठेवणे आवश्यक आहे. 

नंद कृष्णा केमिकल कंपनीत जून २०१९ मध्ये मयूर गणेश शिसोदे या तरुणाचा खून झाला होता. संतप्त ग्रामस्थ व मित्रपरिवाराने पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. पोलिसांनी जंंग जंग पछाडले; पण शेवटी गुन्हा उकल करण्यास अपयश आले. हुसरुद्दीन सिराजुद्दीन शेख या युवकाला तारेने बांधून गावाशेजारील विहिरीत ढकलून खून करण्यात आला होता. होळ शिवारात एका विवाहितेचा गळा चिरून खून करण्यात आला होता. या खुनाच्या तपासात पोलिस संशयितांपर्यंत पोचू शकले नाहीत. आता ही जबाबदारी सहाय्यक निरीक्षक ठाकरे यांच्यावर आली आहे. याशिवाय लपूनछपून चालणारे सट्टे, पत्ते, दारू, अड्डे, कत्तलीसाठी जाणाऱ्या गायी, बंदी असलेले गुटखा वाहतूक, भुरट्या चोऱ्या आदींवर आळा घालण्याची गरज आहे. पोलिस ठाण्यात लॅन्डलाइन नेहमी नादुरूस्त असतो की काय, बहुतांश वेळी कोणी उचलत नाही. कमाईचे पोलिस ठाणे असले तरी जनतेशी सुसंवाद ठेवणे गरजेचे आहे.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nardana will there be a solution to the three murders in nardana