"हंडाभर चांदण्या' नाटकाची पुण्यातील राष्ट्रीय महोत्सवासाठी निवड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

नाशिकः नाशिकचे दत्ता पाटील लिखीत आणि सचिन शिंदे दिग्दर्शित "हंडाभर चांदण्या' या नाटकाची पुण्यातील विनोद दोशी स्मरणार्थ होणाऱ्या साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या "सारंग' राष्ट्रीय नाट्यमहोत्सवासाठी निवड झाली. 24 ते 28 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवासाठी देशातील विविध भाषेतील पाच नाटकांची निवड तज्ज्ञांनी केली. 

नाशिकः नाशिकचे दत्ता पाटील लिखीत आणि सचिन शिंदे दिग्दर्शित "हंडाभर चांदण्या' या नाटकाची पुण्यातील विनोद दोशी स्मरणार्थ होणाऱ्या साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या "सारंग' राष्ट्रीय नाट्यमहोत्सवासाठी निवड झाली. 24 ते 28 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवासाठी देशातील विविध भाषेतील पाच नाटकांची निवड तज्ज्ञांनी केली. 

हे नाटक गेली तीन वर्षे मराठी प्रायोगिक रंगभूमीवर आणि विविध महोत्सवांमध्ये गाजत आहे. पाण्याचा भीषण प्रश्‍न नाटकातून वेगळ्या पद्धतीने मांडला. पाण्याच्या टॅंकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्यासाठी माळावर जमलेल्या छोट्याशा दुष्काळी गावातील विलक्षण गोष्ट त्यात आहे. लोकसंगीताच्या माध्यमातून सद्यस्थितीवर साध्या जगण्यातून उपहासात्मक भाष्य करणारे हे नाटक आहे. प्रमोद गायकवाड हे निर्माते असून प्राजक्त देशमुख, प्रणव प्रभाकर, गीतांजली घोरपडे, नुपूर सावजी, अरूण इंगळे, राहूल गायकवाड, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, धनंजय गोसावी यांच्या भूमिका आहेत. या समकालीन नाटकाची संहिता नुकतीच पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या बी. ए. च्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी निवडली गेली असून पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनामार्फत ही संहिता पुस्तक रूपात येत आहे. 

नक्की वाचा- विद्यार्थ्यांची सुरक्षितता शाळांनी सांभाळावी

सातत्यामुळे यशाला गवसणी 
नाटकाने दिग्दर्शक म्हणून नव्हे, तर संपूर्ण "टीम'ला राज्यात नवी ओळख मिळाली, असे सांगून सचिन शिंदे म्हणाले, की नाशिकमधून जागतिक दर्जाचे नाटक तेही संपूर्ण "टीम' नाशिकची असताना होऊ शकते हे आपण मराठी प्रायोगिक रंगभूमीला दाखवून दिले आहे. विनोद दोशी महोत्सवाचे गिरीश कर्नाड यांनी सारंग नाट्यमहोत्सव असे नामकरण केलेल्या राष्ट्रीय नाट्यमहोत्सवात नाटक सादर करायला मिळणे हे अनेक रंगकर्मींच स्वप्न असते. त्याची पूर्तता होत असल्याचा आनंद आहे. 

""हंडाभर चांदण्या' नाटकाला काळाची मर्यादा नाही. त्यातील मास्तरची भूमिका मला भावली. ज्ञानी असल्याच्या अविर्भावातून त्या दुष्काळी, निराश गावाला गर्तेतून काढताना मास्तरच्या आत मुळात असलेला फोलपणा, कमालीचे नैराश्‍य दिसायला लागते. नाटकाबाबत प्रायोगिक वर्तुळात सतत चर्चा आहे.'' 
- प्राजक्त देशमुख (कलावंत) 

""नाटकात माझ्यासह दत्ता अलगट, अरूण इंगळे असे आम्ही लोकसंगीताच्या माध्यमातून गावाची भावना प्रातिनिधीक स्वरूपात व्यक्त करतो. आम्ही मावळवाडी गावचे कायमचे ग्रामस्थ झालो आहोत.'' 
- राजेंद्र उगले (कलावंत) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news national mohatsav handabhar chandnya