
मागील पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांमध्ये घट होऊ लागली आहे. ही समाधानाची बाब असली तरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारांमध्ये होणारी तुफान गर्दी सर्व उपाययोजनांवर पाणी फिरविणारी ठरण्याची शक्यता आहे.
नवापूर (नंदुरबार) : दिपावली पर्व सुरु झाले असले तरी कोरोना अजून तळ ठोकून आहे हे विसरता कामा नये. खरेदीसाठी बाजारात तुफान गर्दी, मास्क, फिजिकल डिस्टंसिंगचाही विसर पडल्यासारख लोकांचा सार्वजनिक ठिकाणी व्यवहार पाहता लक्षात येते. लोकांचा निष्कळजीपणा म्हणजे धोक्याची घंटा. दिवाळीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी खरेदी किंवा गर्दीला मुरड घालण्याचा तज्ज्ञाचा सल्ला सोबतच शासनाने खास परिपत्रक काढून जनजागृती करीत आहे.
गेली सात ते आठ महिन्यांपासून नवापूर तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक अनुभवल्यानंतर मागील पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांमध्ये घट होऊ लागली आहे. ही समाधानाची बाब असली तरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारांमध्ये होणारी तुफान गर्दी सर्व उपाययोजनांवर पाणी फिरविणारी ठरण्याची शक्यता आहे. दाटीवाटीने होणारी खरेदी आणि मास्कचा विसर हे चित्र येणाऱ्या दिवसात धोक्याची घंटा ठरू शकते. लोकांनी निष्काळजीपणा न करता यंदा खरेदीला मुरड घालण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
दहशतीनंतर कोरोना नियंत्रणात
एप्रिल, मे महिन्यानंतर जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाला सुरुवात झाली. नवापूर तालुक्यात जुलै महिन्यात सुरुवात झाली. गेली सात ते आठ महिन्यांपासून नागरिक दहशतीत वावरत आहेत. मात्र, शहर- जिल्हा आरोग्य यंत्रणा, पालिका व जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांनी आजघडीला कोरोनावर नियंत्रण येत आहे. रोज शंभरीच्या आसपास कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघत असताना गेल्या १५ दिवसांपासून पन्नासीच्या आत रुग्ण आढळत आहेत. ही समाधानाची बाब असली तरी यामुळे लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. येणाऱ्या काळात हे धोकादायक ठरू शकते.
दिपोत्सवाच्या खरेदीत पडला विसर
नंदुरबार जिल्ह्यात एकूण कोरोना बधितांची संख्या ६ हजार ११४ झाली आहे. यातील ५ हजार ७०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात एकूण मृत्यूचा आकडा १५९ आहे. सद्या अडीचशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २४ हजार ५४१ लोकांचे स्वाब घेतले आहेत. कोरोनामुळे यावर्षी सर्व सणवार घरीच साधेपणाने साजरे करण्यात आले. परंतु, आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी बाजार होणारी झुंबड चिंतीत करणारी आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टंसिंग आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा लोकांना विसर पडत असल्याचे दिसत आहे.
"बिनधास्त राहू नका !"
नुकत्याच झालेल्या बैठकीत आम्ही लोकप्रतिनिधींनी दिवाळीनिमित्त बाजारात होणाऱ्या गर्दीवर चिंता व्यक्त केली आहे. याबाबत प्रशासनाने गाफील न राहता अधिक काळजी घेण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत तसेच नागरिकांनीही निष्काळजीपणा सोडण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या नियमांचे पालन करून त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहनदेखील बैठकीतून करण्यात आले आहे.
- शिरिषकुमार नाईक, आमदार, नवापूर
"... अन्यथा प्रशासनाच्या प्रयत्नांवर पाणी !"
गेली आठ महिने सर्वच प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनी कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. विविध उपक्रमातुन कोरोना जनजागृतीही सुरु आहे. शहर, जिल्ह्यात आवश्यक उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र येणाऱ्या दिवसात लोकांचा निष्काळजीपणा या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरविणारे ठरू शकते. परिस्थिती नियंत्रणात येत आणताना आणखी महिनाभर तरी लोकांनी कोरोनाबाबतीत गंभीर राहणे गरजेचे आहे.
- हेमलता पाटील, नगराध्यक्ष नवापूर
"उद्रेकाची दाट शक्यता !"
लोकांनी आवश्यक खबरदरी न घेता गर्दीत मिसळल्यास येणाऱ्या काळात कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. कोरोना ची लक्षणे आढळ्यास किंवा तत्त्सम को-मॉर्बिड रुग्णांच्या व सर्दी-खोकला-ताप, फ्लू तपासण्या करण्याचे निर्दश आम्ही दिलेले आहेत. हे संशियत रुग्ण गर्दीत मिसळल्यास इतरांना प्रादुर्भावाची शक्यता आहे. अन्यथा दिल्लीत जे घडले ते इतर जिल्ह्यातही घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. लोकांनी गर्दीत जाणे टाळणे आणि काळजी घेणे हाच उपाय आहे.
– डॉ. शशिकांत वसावे, तालुका आरोग्य अधिकारी
संपादन ः राजेश सोनवणे