कृषी तंत्रज्ञान प्रकल्पासाठी ३७ गावांची निवड 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

कृषी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध फार्मर्स प्रोड्युसर कंपनीपैकी आदिवासी नवापूर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने वडसत्रा येथे भेट देऊन पाहणी केली

नवापूर (नंदुरबार) : हवामान अनुकूल पीकपद्धतीसाठी पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापन व कृषी तंत्रज्ञान अवलंबन प्रकल्प नवापूर तालुक्यात राबविण्यासाठी ३७ गावांची निवड झाली. २०२०-२१ या वर्षात प्रकल्प आराखड्यांना मंजुरी देऊन रब्बी हंगामापासून विविध घटक राबविण्यास सुरवात झाली आहे. 
यातील एक भाग म्हणून रब्बी हंगामात हरभरा व रब्बी ज्वारीची पीक प्रात्यक्षिके या गावांमध्ये करण्यात येत आहे. २६ नोव्हेंबरला ‘नाबार्ड’चे डीडीएम प्रमोद पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, कोळदे येथील कृषी विज्ञान केंद्राचे कृषितज्ज्ञ प्रा. यू. डी. पाटील यांनी तालुक्यातील वडसत्रा, चितवी, चिंचपाडा, चेडापाडा या गावांना भेटी देऊन विविध पीक प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी करून तांत्रिक मार्गदर्शन केले. भेटीवेळी वडसत्राचे सरपंच बाबू गावित, उपसरपंच काशीराम गावित, चितवीचे सरपंच दिनेश गावित, प्रगतिशील शेतकरी अरविंद गावित व शेतकरी उपस्थित होते. 

भेट देवून पाहणी
कृषी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध फार्मर्स प्रोड्युसर कंपनीपैकी आदिवासी नवापूर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने वडसत्रा येथे भेट देऊन पाहणी केली व कंपनीचे संस्थात्मक संचालक सत्यानंद गावित यांच्याशी चर्चा केली. एमआयडीएच अंतर्गत शेड नेटमधील काकडी लागवड, आद्रक लागवड, प्लॅस्टिक मल्चिंग, सामूहिक शेततळे व त्यामधील मच्छ-पालन, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड आदी घटकांची पाहणी करून मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी बी. जे. गावित, मंडल कृषी अधिकारी शिवाजी राऊत, नितीन गांगुर्डे, विसरवाडी व चिंचपाडा मंडलातील सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक सेवक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur agriculture prakalp 37 village silection