बायोडिझेलची अनधिकृत विक्री...सिल केलेला पंप दोन दिवसात सुरू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 July 2020

बायोडिझेल पंप चालकाने एकाच दिवसांत सादर केलेले नाहरकत दाखले व कागदपत्रांची तपासणी करण्याची व कारवाई करण्याची मागणी गोपाल दिपचंद अग्रवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

नवापूर : जिल्‍ह्यातील काही बायोडिझेल पंप चालकांना परवानगी नसतांनाही बायोडिझेल विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अत्यावश्यक कागदपत्रे नसल्याने नवापूर तहसीलदारांनी तालुक्यातील दोन पंप सील केले, मात्र दोन दिवसांत एक पंप सुरू झाला. बायोडिझेल पंप चालकाने एकाच दिवसांत सादर केलेले नाहरकत दाखले व कागदपत्रांची तपासणी करण्याची व कारवाई करण्याची मागणी गोपाल दिपचंद अग्रवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

नवापूर तालुक्यात दोन बायोडिझेल पंप धुळे सुरत या राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आले आहेत. कोठडा (ता. नवापूर) शिवारातील बायोडिझेल पंपवर २६ जुलैला तहसीलदार व नवापूर पोलिसांनी तपासणी केली. पंप चालवण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने, ना हरकत दाखले मिळून आले नाहीत. त्यामुळे पंप मालक उपस्थित असताना अधिकाऱ्यांनी पंप सील केले होते. मात्र दोन दिवसात २८ जुलैला सील उघडून पंपवर बायोडिझेलची विक्री सुरू झाली. 

एका दिवसात मुंबईहून ना हरकत
जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयातून आजपर्यंत कोणालाही बायोडिझेल पंप बाबत ना हरकत दाखला देण्यात आलेला नाही, असे गोपाल दिपचंद अग्रवाल (शिरपूर) यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पंपमालकाने एकाच दिवसात मुंबईला जाऊन मागील जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्याकडून मागील तारीख नमुद करून ना हरकत दाखला आणला. नाहरकत दाखले खोटे आढळून आल्यास ते रद्द करावे अशी मागणी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur biodiesel pump seal and after two days open