नवापूरच्या सीमेलगतच्या गावात अनोळखी चेहरे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

पाच दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास ऊसतोडणी व इतर काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या परिवारासह गुजरात राज्यातून चार-पाच ट्रक भरून नवापूर तालुक्यात विसरवाडी व कोंडाईबारी दरम्यान असलेल्या पोलिस चौकीजवळ सोडून देण्यात आले होते.

नवापूर : गुजरातच्या सीमेलगत असल्याने नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मजुरांचे आगमन होत आहे. यातील बहुतेकांची तपासणी केली जात आहे. मात्र काही चोरट्या वाटा असल्याने अनेक अनोळखी लोक सीमेलगतच्या गावात विनातपासणीचे वावरत असल्याचे दिसून येत आहे. नागरिक याबाबत उघडपणे चर्चा करू लागले आहेत, त्यामुळे सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. 

पाच दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास ऊसतोडणी व इतर काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या परिवारासह गुजरात राज्यातून चार-पाच ट्रक भरून नवापूर तालुक्यात विसरवाडी व कोंडाईबारी दरम्यान असलेल्या पोलिस चौकीजवळ सोडून देण्यात आले होते. पोलिसांनी या गाड्या पुढे जाऊ दिल्या नाहीत. चारशे ते पाचशे लोकांचा ताफा पायी पुढे कुठे गेला माहीत नाही. यातील जर कुणी कोरोनाचा बाधित असेल तर संक्रमण होण्याची भीती नाकारता येत नाही. 

वाकीपाडा या गावात अनोळखी चेहरे घोळक्याने फिरत आहेत. या गावात तमिळ, समाजाची वसाहत आहे. या परिसरात काही अनोळखी चेहऱ्याची संख्या वाढली आहे. राज्याच्या सीमा सील आहेत, परराज्यातून आलेल्या लोकांना खबरदारी म्हणून होम क्वारोंटाइन केले जात आहे. हे लोक स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांना जुमानत नाही. संचारबंदी असतांना घोळक्याने फिरतात. स्थानिक लोकांनी विरोध केला तर ऐकत नाही. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हरिश्चंद्र कोकणी व त्यांच्या पथकाने भेट दिली मात्र त्यांचाही या समुदायावर फारसा फरक पडलेला दिसत नाही. 

नवापूर तालुक्यात प्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. अनेक गावांमध्ये बाहेरून आलेली मंडळी बिना माहितीची समाजात फिरत आहेत, त्यांच्या विषयी लोक चर्चा करतात मात्र त्या लोकांच्या दबदबा असल्याने कोणीही जाहीरपणे बोलत नाहीत, अशा लोकांचाही बंदोबस्त झाला पाहिजे. 
पालिकेच्या आरोग्य विभागाने व काही नगरसेवकांनी शहरात औषध फवारणी केली, मुखाधिकारी एक महिन्यापासून वैद्यकीय रजेवर आहेत, प्रभारी मुख्याधिकारी वेळकाढू धोरण अवलंबून आहेत. 
 
पोलिसांनी दंडुका उगारला पाहिजे 
संचारबंदी लागू झाल्यापासून शहरात व तालुक्यात लोकप्रतिनिधी, समाजसेवी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस प्रशासन, पेट्रोल पंप चालक तर काही वयक्तिक रीत्या आपापल्या परीने भोजन व अन्न धान्याचे वाटप करीत आहेत. कुणीही उपाशीपोटी राहू नये याची काळजी घेत आहेत. नागरिक मात्र घराबाहेर पडून सर्व प्रयत्न हाणून पाडत आहेत ही शोकांतिका आहे, यावर कडक उपाययोजना राबविण्याची वेळ आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur border aria stranger new face lockdown pariad