esakal | रहस्‍यमय..जंगलातील धबधब्‍यावर गेले; युवक अचानक झाला गायब
sakal

बोलून बातमी शोधा

kakakaki waterfall

गुजरात राज्यातील रात्री साडे अकराच्या सुमारास एक व्यक्तीचा आवाज जंगलातून येत होता. परंतू तो कोणाचा आवाज होता हे कळाले नाही. युवकाला शोधण्यासाठी जंगलात चार टिम रवाना झाल्या आहेत.

रहस्‍यमय..जंगलातील धबधब्‍यावर गेले; युवक अचानक झाला गायब

sakal_logo
By
विनोद सुर्यवंशी

नवापूर (नंदुरबार) :  शहरातील नऊ- दहा मुलं चरणमाळ (ता. नवापूर) जंगलातील काका- काकी धबधब्यावर फिरत गेले; तेथे अंघोळ करण्यासाठी उडी मारली. पण धबधबा परिसरातून २१ वर्षीय युवक बेपत्ता झाला. सदर धबधबा हा डांग (गुजरात राज्यात) हद्दीत आहे. आपल्यापैकी एक जण दिसत नाही हे मित्रांना जेव्हा लक्षात आले तेव्हापासून शोधाशोध सुरू आहे. रात्रीपासून तर आज दिवसभर शोध सुरू असून यश आले नाही.

नवापूर शहरात रविवारी जनता कर्फ्यू असल्याने सर्व बाजारपेठ बंद होत्‍या. यामुळे संधी साधत शहरातील नागरिक आपल्यापरीने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी फिरायला जातात. नवापूर तालुक्यातील आजूबाजूच्या जंगलात फिरण्यासाठी जातात. यात रविवारी (ता. २७) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास नवापूर शहरातील दहा युवक चरणमाळ जंगलातील काका काकी धबधब्यावर अंघोळ करण्यासाठी गेले. साधारण तासभरात अंधोळ केल्यानंतर त्यातील एक युवक बेपत्‍ता झाला. 

लघुशंका करण्यासाठी गेला अन्‌
मोहम्मद अब्दुल खालिक घरिया (वय २१,  राहणार शिवाजी रोड, नवापूर) बसे बेपत्‍ता झालेल्‍या युवकाचे नाव आहे. सदर युवक लघुशंका करून येतो असे सांगून धबधब्या बाहेर पडला असे काहींचे म्हणणे आहे. तर काही मित्रांनी सांगितले हा कोणालाही काही न सांगता अचानक गायब झाला. त्यांच्या मित्रांना वाटले की घरी निघून गेला असेल; परंतु घरी आले असता मोहम्‍मद हा अजून घरी पोहोचलाच नाही. त्यानंतर नातेवाईकांनी नवापूर पोलीसांना सदर घटनेबाबत व तिथून बेपत्ता झाल्याची माहिती दिली. 

रात्री तीनपर्यंत शोधाशोध
नातेवाईक व पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण यांनी रात्री दोन तीन वाजेच्या पर्यंत जंगलात स्थानिक लोकांच्या मदतीने शोध घेतला. परंतू अंधार असल्याने अनेक अडचणी येत होत्या. काही स्थानिक ग्रामस्थांनी अशी माहिती दिली की गुजरात राज्यातील रात्री साडे अकराच्या सुमारास एक व्यक्तीचा आवाज जंगलातून येत होता. परंतू तो कोणाचा आवाज होता हे कळाले नाही. युवकाला शोधण्यासाठी जंगलात चार टिम रवाना झाल्या आहेत. 

काका काकी धबधबा
काका काकी धबधबा हा नंदुरबार, धुळे, गुजरात राज्यातील डांग, तापी जिल्ह्यातील सीमावर्ती भागात येतो. येथे अनेक पर्यटक सहलीसाठी येत असतात. धबधब्याखाली खोल पाणी आहे. या पाण्यात देखील स्थानिक लोकांनी शोध घेतला. परंतू काही मिळून आले नाही. नवापूर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यासंदर्भात गुजरात राज्यातील पोलीस व वन खात्याला माहिती देऊन शोध मोहीमसाठी मदत घेणार आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे