
दिवाळी सणापुर्वी एसटी कामगारांना तीन महिन्यांचे वेतन, महागाई भत्याची थकबाकी व सण उचल मिळणे आवश्यक आहे. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कामाचे वेतन मिळत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे.
नवापूर (नंदुरबार) : गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नसल्याने काही कर्मचारी मिळेल ते काम करून उदरनिर्वाह भागवित आहेत. अशातच दिवाळीचा उत्सव असल्याने घरात दिवाळी साजरी करायची म्हणून दिवाळी साहित्य खरेदी करूनच उदरनिर्वाह भागवत आहेत ते नवापूर बसचे वाहक संजय शिंदे.
दिवाळी सणापुर्वी एसटी कामगारांना तीन महिन्यांचे वेतन, महागाई भत्याची थकबाकी व सण उचल मिळणे आवश्यक आहे. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कामाचे वेतन मिळत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे. दिवाळीपुर्वी सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत निवेदन २ नोव्हेंबरला महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने आमदार शिरीषकुमार नाईक व तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना दिले होते. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले. मात्र राज्य परिवहन महामंडळाने कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही, म्हणून एसटी कामगारांनी कुटूंबियांसह आपल्या राहत्या घरी ९ नोव्हेंबर वेतन मिळावे या मागणीसाठी आक्रोश व्यक्त केला.
एसटीतील ७४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
कोरोनाच्या आपत्ती काळात सोई सुविधांचा अभाव असतानाही एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. सध्या मुंबई बेस्टची प्रवाशी वाहतूकही एसटी कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत. एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधित झालेले असून सुमारे ७४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेले आहेत.
एसटी कर्मचारी लाभापासून दूरच
कोरोना कालावधीत कामगार प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतानाही कामगारांना ऑगस्ट २०२० पासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व सण उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१९ पासून वाढीव ५ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे. परंतु एसटी कामगारांना हा महागाई भत्ता अद्याप लागू केलेला नाही. सन २०१८ ची वाढीव २ टक्क्याची तीन महिन्यांची थकबाकी व सन २०१९ ची ३ टक्क्याची नऊ महिन्यांची महागाई भत्याची थकबाकीही एसटी कामगारांना अद्याप मिळालेली नाही.
दिवाळी साजरी करण्यासाठी काहीही
दिवाळी सण १२ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. सणापुर्वी एसटी कामगारांना मागील दोन महिन्यांचे थकीत वेतनासह ऑक्टोबरचे वेतन, महागाई भत्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळणे आवश्यक आहे. वेतनाअभावी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेमुळे कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी एसटी वाहक संजय शिंदे दिपावली सणाचे औचित्य साधून फुल माळा, दिवे आदी साहित्य नोकरी करून मिळेल त्या वेळेत घरोघरी व दुकानांवर जाऊन विक्री करीत आहेत. अशी परिस्थिती यापूर्वी कधीच उद्भवली नव्हती असे मत श्री शिंदे यांनी व्यक्त केले.
संपादन ः राजेश सोनवणे