डायलिसीसचे रूग्ण जीवनमरणाच्या उंबरठ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

कोरोनामुळे संचारबंदी असल्याने डायलिसिस करणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत.नवापूर शहरात डायलिसीसचे ७ रुग्ण असून ते मागील आठवड्यापर्यंत गुजरातमधील व्यारा, सुरत येथ जात होते.

नवापूर : संचारबंदी अन कोरोना डायलिसिसवर असणाऱ्या रुग्णाच्या जिवावर उठली आहे. आतापर्यंत उपचार करणारे गुजरातचे दवाखाने महाराष्ट्रच्या रुग्णांना सेवा देण्यास तयार नाही. महाराष्ट्रातील वैद्यकीय सेवा देणारी व्यवस्था या रुग्णांना अपमानित करून परत पाठवित आहेत. तात्काळ डायलिसिस न झाल्यास या रूग्णांच्या जीवावर बेतणार आहे, हे माहीत असूनही नंदुरबारचे जिल्हा शल्य चिकित्सकांची या रूग्णांशी वर्तणूक संतापदायी आहे. याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा असे निवेदन आज भाजपचे जिल्हा चिटणीस एजाज शेख यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. 
कोरोनामुळे संचारबंदी असल्याने डायलिसिस करणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत.नवापूर शहरात डायलिसीसचे ७ रुग्ण असून ते मागील आठवड्यापर्यंत गुजरातमधील व्यारा, सुरत येथ जात होते. परंतु कोरोनाचा संसर्ग जास्त वाढल्याने सुरत व तापी (व्यारा) जिल्हाधिकारींनी व्यारा सिव्हिल हॉस्पिटलच्या लेखी आदेशाने महाराष्ट्रातील कोणत्याही रुग्णांना उपचार करण्यात येऊ नये असे बजावले आहे, त्यामुळे या दोन्ही शहरात जाणाऱ्या रुग्णांना मागील आठवड्या पासून नाकारण्यात आले आहे. 
नवापूर शहरात सध्या निखिल अरविंद जोशी, अशफाक युसूफ कुरेशी, युसूफ मियाखा कुरेशी, मुस्ताक युसूफ कुरेशी, रवींद्र गुलाबराव पाटील, अरविंद भीकुभाई प्रजापत, अनुरागसिंग बलविरसिंग यादव हे डायलिसीसचे रूग्ण आहेत. 
या रुग्णाचे एक-एक डायलासीस मिस झाले आहे, त्यामुळे आज सकाळी यापैकी तीन रुग्णांना नंदूरबार सिव्हिल हॉस्पिटल व नंदूरबार नगरपालिकेच्या डायलिसीस केंद्रावर पाठवले होते परंतु त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन डायलेसीस न करता दोन्ही ठिकाणाहून परत पाठवून देण्यात आले. या सर्व रुग्णांना उद्यापर्यंत डायलासीस झाले नाही तर त्यांची प्रकृती खालावणार असल्याचे लक्षण त्यांच्या शरीरावर दिसायला सुरवात झाली आहे. 
 
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे 
या परिस्थितीत या रुग्णाचे नवापूरचे रहिवासी होणे व राहणे शाप ठरत असून गुजरात त्यांना महाराष्ट्राचे असल्यामुळे उपचार करूत नाही तर महाराष्ट्र रहिवाशी असून देखील त्यांना नंदुरबारहून त्यांना अपमानित करून परत पाठवून दिले. आता या रुग्णांना वाली कोण? त्यांचे बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण? मुखमंत्र्यांनी याबाबत सहानुभूती पूर्वक विचार करून त्यांना व्यारा (गुजरात) अथवा नंदुरबारला होऊ शकेल यांच्यासाठी योग्य ते आदेश तापी जिल्हाधिकारी अथवा नंदुरबार सिव्हिल सर्जन याना द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur dialysis dialysis patient lockdown