सोशल मिडीयावर केली जाहिरात...ग्राहक नाही पण हॉटेलवर आले हे अन्‌ फसला

विनोद सूर्यवंशी
Thursday, 23 July 2020

हॉटेलवर देण्यात आलेली घोरपड वन्यप्राणी गुजरात राज्यातील चार अज्ञात ग्राहकांनी बनविण्यासाठी येथे आणली होती. घोरपडचे मटन करुन पार्टी करण्याचा बेत होता. पण हॉटेल मालकाने आमच्या हॉटेलवर घोरपडचे मास मिळेल; अशी जाहीरात सोशलमिडीयावर फिरविली.

नवापूर : आमच्या हॉटेलवर घोरपडचे मास मिळेल...अशी जाहीरात ग्राहक येण्यासाठी सोशल मिडीयावर फिरविली. पण झाले उलटेच, ग्राहक तर आले नाही पण वन विभागाचे अधिकारी पोहोचले आणि गुन्हा दाखल झाला. खानसामाच्या अज्ञान म्हणा की सोशल मीडियावरील टाकलेली पोस्ट त्‍याला चांगलीच महागात पडली. 

शहरातील नारायणपूर रस्त्यावरील एका हॉटेलवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी छापा टाकला. हॉटेलच्या स्वंयपाक गृहात दुर्मिळ जातीचे घोरपडचे मास, कातडी व डोके असा अवशेष आढळून आला. त्यावरून खानसामा व हॉटल मालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पार्टीसाठी दिली होती घोरपड
हॉटेलवर देण्यात आलेली घोरपड वन्यप्राणी गुजरात राज्यातील चार अज्ञात ग्राहकांनी बनविण्यासाठी येथे आणली होती. घोरपडचे मटन करुन पार्टी करण्याचा बेत होता. पण हॉटेल मालकाने आमच्या हॉटेलवर घोरपडचे मास मिळेल; अशी जाहीरात सोशलमिडीयावर फिरविली. या जाहिरातीवरून वन विभागाचे अधिकारी गणेश रणदिवे व त्‍यांच्या पथकाने छापा टाकून कार्यवाही केली. पण गुजरात राज्यातुन घोरपड आणुन देणाऱ्या ग्राहक तथा वनतस्कराच्या शोध नंदुरबार वनविभाग घेत आहे.  

शिकार सुरूच
नंदुरबारचे उपवनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या पथकाने कार्यवाही करुन हॉटेल मालकसह खानसामा यांच्या विरोधात वन अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना स्थळावरुन वस्तुजन्य पुरावा जप्त करण्यात आला आहे. नवापूर तालुक्यात संचारबंदीच्या दरम्यान जंगलात जाऊन वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. लॉकडाऊमध्ये वन्यप्राण्याची हत्या करुन पार्टी केल्या जात आहेत. अनलॉकमध्ये देखील वनप्राणी व पक्षाची हत्या करुन पार्टीचे सत्र सुरु आहे असे बोलले जात आहे. सदर कारवाई नंदुरबारचे उपविभागीय वनाधिकारी गणेश रणदिवे, नवापूर वनपाल प्रकाश मावची, डि. के. जाधव, कल्पेश आहिरे, प्रशांत सोनवणे, श्री. पदमोर, वनरक्षक दीपक पाटील, माजी सैनिक शिरसाठ होते. 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur hotel lunch ghorpad advatisement social media and fir