लाडके बाप्पा आणा एक रूपयात...कुठे मिळतेय, काय आहे कारण पहा! 

विनायक सुर्यवंशी
Friday, 21 August 2020

लाडक्‍या गणरायाचे स्वागत अगदी धुमधडाक्‍यात केले जाते. एक..दोन...तीन...चार..गणपतीचा जय जयकार असे म्हणत बाप्पाची घरोघरी प्रतिष्ठापना केली जाते. यंदा मात्र कोरोना महामारीने मोठे संकट उभे असल्याने अनेकांना गणेश मुर्ती घेणे देखील अवघड आहे. अशात अवघ्या एक रूपयात बाप्पाची गणेश मुर्ती मिळत असल्याने आनंदाला पारावार उरणार नाही हे मात्र निश्‍चित.

नवापूर : इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे घरात श्रींची मूर्ती स्थापना करू शकत नाही. कोरोना महामारीमुळे बहुतेक कुटुंबाला दोन वेळचे जेवण मिळत नाही. अशा बिकट प्रसंगी ते गणेशाची मुर्ती कशी घेऊ शकतील. अशा लोकांना एक रुपया घेऊन गणरायाची मुर्ती देऊन त्यांना आनंदात सहभागी कसे होता येईल; याचा प्रयत्न जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावीत यांनी केला आहे. प्रत्येकाच्या घरात गणरायाचे आगमन झाले पाहिजे. या धार्मिक भावनेने गावीत परिवार व मित्र परिवाराने गणपतीची मुर्ती फक्त एक रुपयात देण्याचा संकल्प केला. 

कोरोनामुळे या वर्षी सर्व गणेश मंडळांना गणेश उत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा लागणार आहे. कोरोना आणि त्याअनुषंगाने निर्माण झालेली बिकट परिस्थिती लक्षात घेऊन भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावीत यांनी तालुक्‍यात 511 गणेश मुर्ती फक्त एक रुपयात भक्तांना दिली. गणेश मूर्ती देण्याची सुरुवात खांडबारा गावापासुन केली आहे. जि.प. सदस्य भरत गावीत यांच्या या उपक्रमाने गणेश भक्तांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सदर उपक्रम पहिल्यांदाच भरत गावीत यांच्या कल्पकतेनुन राबविण्यात आला. कोरोना काळात भरत गावीत यांनी गरजुना जेवानाची व्यवस्था, मालेगाव काढाचे पाकीट वाटप व आता श्री गणेशाची मुर्तीचे वाटप करीत आहे. या उपक्रमात भाजपचे नगरसेवक महेंद्र दुसाने, धनंजय गावीत, राजु गावीत मित्रपरिवार सहभागी असुन ग्रामीण भागात मूर्ती चे वाटप होत आहे. 

मग पुढल्या वर्षी धुमधडाक्‍यातच स्वागत 
गणरायावर श्रध्दा आहे. सर्वत्र कोरोना महामारीमुळे बरेच माता भगीनी बाल गोपाल मंडळी घरात आहेत. त्यांचा रोजगार बंद झाला आहे. दरवर्षी गणरायाचे वाजत गाजत आगमन होत असते; यावर्षी कोरोना असल्यामुळे कुठे तरी विघ्न यायला नको. आपली परंपरा, श्रध्दा आहे प्रत्येकाच्या घरात गणरायाचे आगमन झाले पाहिजे. या अनुषंगाने गावीत परिवार व मित्रपरिवाराने एक संकल्प केला की गणपतीची मुर्ती आपल्या परिवाराकडून एक रुपयात देवू. कोरोना महामारीमुळे गरिबांना दोन वेळचे जेवण मिळत नाही अशा प्रसंगी ते गणेशाची मुर्ती कशी घेणार, त्यांना रोजगार नाही अशा लोकांना एक रुपयात गणरायाची मुर्ती द्यायची आणि त्यांना आपल्या आनंदात सहभागी करण्याचा प्रयत्न केला आहे. बाप्पा कोरोणाला दुर करतील. पुढचा वर्षी धुमधुडाक्‍यात बाप्पाचे स्वागत करु असे मत जि.प. सदस्य भरत गावीत यांनी व्यक्‍त केले. 

संपादन : राजेश सोनवणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur one rupees ganesh avalable zp member bharat gavit