पालिका करते ‘तत्‍पर नवापूरकर’ने सन्मान

विनायक सुर्यवंशी
Sunday, 11 October 2020

शहराचा विकास कामासाठी आर्थिक तरतूद महत्वाची असते. शासनाकडून विविध विकास कामासाठी निधी येत असला तरी पालिकेजवळ स्वतः चा निधी असणं आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा करून पालिकेला सहकार्य करावे. 
- तृप्ती धोडमिसे, मुख्याधिकारी, नवापूर पालिका 

नवापूर (नंदुरबार) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची कमकुवत झालेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवापूर पालिकेने ‘तत्पर नवापूरकर’ अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत ज्या नागरिकांनी मालमत्ता व पाणीपट्टी कराचा भरणा बिल मिळाल्यानंतर  कमी कालावधीत केला आहे. त्या नागरिकांना पालिकेतर्फे "तत्पर नवापूरकर"  गौरवपत्राद्वारे सन्मानित करण्यात येत आहे. 

कोरोना काळात पालिकेची कर वसुली अपेक्षित रित्या झाली नाही. गेल्या सात महिन्यापासून कर वसुलीत अडचणी आल्या. शहराच्या विकासासाठी निधी आवश्यक आहे. या आर्थिक वर्षासोबत मागील थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाने ‘तत्पर नवापूरकर’ अभियान सुरु केले आहे. सर्वसाधारण करदात्यांचा उद्योग व्यवसाय डबघाईला आला आहे. दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा बिकट परिस्थितीत कर भरणा करणे शक्य झाले नाही. मात्र आता अनलॉक काळातउद्योग धंदे काही प्रमाणात सुरू झाले. आता राज्य सरकार व स्थानिक पातळीवर प्रशासनाने उद्योग व्यवसायाला वेळेत थोडी सूट मिळाल्याने आर्थिकदृष्ट्या चालना मिळायला सुरवात झाली आहे. पालिकेने परिस्थितीचा आढावा घेत पालिका निधी उपलब्ध करण्यासाठी ही योजना सुरू केली. 

बँकच ठरली पहिली मानकरी
पालिकेने सुरू केलेल्‍या अभियानाचे प्रथम मानकरी स्टेट बँक ऑफ इंडियाची नवापूर शाखा ठरली आहे. स्टेट बँक शाखाधिकारी व उद्योजक विपीनभाई चोखावला यांचा नगराध्यक्षा हेमलता पाटील व मुख्याधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ‘तत्पर नवापूरकर’ प्रमाणपत्र देऊन गौरव केला. 

मालमत्ता धारक नागरिकांनी कराचा भरणा त्वरित भरणा करून नगरपालिकेच्या आहवानास प्रतिसाद द्यावा. वेळेत कराचा भरणा करून पालिकेला या आर्थिक संकटाच्या वेळी सहकार्य केल्याबद्दल त्यांना गौरवपत्राद्वारे  सन्मानित केले जाईल.
- हेमलता पाटील, नगराध्यक्षा नवापूर 

 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur palika start abhiyan in tax recovery