
दर महिन्याला शाळांच्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळावे, ही माफक अपेक्षा असते. सर्वांचे ऑगस्टपासून वेतन थकीत आहे.
शिक्षण विभागातील वेतनाचा तिढा सुटला; कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
नवापूर : नंदुरबार जिल्ह्यातील लेखाशीर्ष १९०१ अंतर्गत वेतन घेणाऱ्या माध्यमिक शाळांच्या वेतनाची समस्या संघटनेच्या प्रयत्नामुळे मार्गी लागली असून, त्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. शिक्षण उपसंचालक ज्योती शिंदे यांनी वेतनासाठी नंदुरबार जिल्ह्याला सव्वा कोटीचा निधी दिल्याचे पत्र दिले आहे. दिवाळीपूर्वी ऑगस्टचे वेतन मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.
वाचा- अभाविपचे राष्ट्रीय मंत्री ओव्हाळ यांचा नंदुरबारला नदीत बुडून मृत्यू -
आदिवासी विकास विभागाच्या अनुदानातून १९०१ या हेड अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक १६ शाळा व ४७ तुकड्यांचे वेतन मिळते. दर महिन्याला शाळांच्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळावे, ही माफक अपेक्षा असते. सर्वांचे ऑगस्टपासून वेतन थकीत आहे. दिवाळी आली तरी वेतनाबाबत शाश्वती नव्हती. शिल्लक निधीतून काही शाळा व काही तुकड्यांचे वेतन टाकले होते. उर्वरित शाळा व तुकड्या निधीची वाट पाहत होते. दिवाळीपूर्वी सर्वांचे वेतन मिळावे, यासाठी माध्यमिक शिक्षक संघटना प्रयत्नशील होती. माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर नांद्रे व ‘टीडीएफ’चे सहकार्यवाह डॉ. एन. डी. नांद्रे यांनी ४ नोव्हेंबरला मंत्रालयात शालेय शिक्षण विभाग व आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ऑगस्टपासून थकीत वेतनाबाबत पाठपुरावा केला. वेतन अधीक्षक शरद चव्हाण, संघटनेचे जिल्हाध्यक्ष नांद्रे यांनी सोमवारी (ता. ९) दिवसभर वेतनाचा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न करून तसे पत्र काढायला भाग पाडले.
लेखाशीर्ष १९०१ संदर्भात ४ नोव्हेंबरला ‘टीडीएफ’चे सहकार्यवाह डॉ. एन. डी. नांद्रे यांच्यासह आम्ही शालेय शिक्षण विभाग व आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ऑगस्टपासून थकीत वेतनाबाबत पाठपुरावा केला. यामुळे शिक्षण उपसंचालकांनी राज्यातील १९०१ या हेडसाठी पाच कोटी मंजूर केले. त्यापैकी नंदुरबार जिल्ह्यातील वेतनासाठी सव्वा कोटीचा निधी दिल्याचे पत्र दिले.
-प्रभाकर नांद्रे, जिल्हाध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघटना, नंदुरबार
संपादन- भूषण श्रीखंडे
Web Title: Marathi News Navapur Salary Education Department Has Gone Sharply
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..