शिक्षकांची दिवाळी गोड; वेतनाचा तिढा सुटला; 

विनायक सुर्यवंशी
Tuesday, 10 November 2020

आदिवासी विकास विभागाच्या अनुदानातून १९०१ या हेड अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक १६ शाळा व ४७ तुकड्यांचे वेतन मिळते. दर महिन्याला या हेड अंतर्गत येणाऱ्या शाळांच्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळावे एवढी माफक अपेक्षा असते.

नवापूर (नंदुरबार) : नंदूरबार जिल्ह्यातील लेखाशिर्ष १९०१ अंतर्गत वेतन घेणाऱ्या माध्यमिक शाळांची वेतन समस्या आज संघटनेच्या प्रयत्नामुळे मार्गी लागल्याने दिवाळी गोड होणार. पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या शिक्षण उपसंचालक ज्योती शिंदे यांनी वेतनासाठी नंदुरबार जिल्ह्याला सव्वा कोटींचा निधी दिल्याचे पत्र पारीत केले. दिवाळीच्या आधी ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे. 

आदिवासी विकास विभागाच्या अनुदानातून १९०१ या हेड अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक १६ शाळा व ४७ तुकड्यांचे वेतन मिळते. दर महिन्याला या हेड अंतर्गत येणाऱ्या शाळांच्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळावे एवढी माफक अपेक्षा असते. सर्वांचे ऑगस्ट महिन्यापासून वेतन थकीत आहे. दिवाळी आली तरी वेतन बाबत शाश्वती नव्हती. शिल्लक निधीतून काही शाळा व काही तुकड्यांचे वेतन टाकले होते उर्वरित शाळा व तुकड्या निधीची वाट पहात होते. 

शिक्षक संघटना होत्‍या प्रयत्‍नशील
दिवाळी आधी सर्वांचे वेतन मिळावे यासाठी माध्यमिक शिक्षक संघटना प्रयत्नशील होती. माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर नांद्रे व टीडीएफचे सहकार्यवाह डॉ. एन. डी. नांद्रे यांनी ४ नोव्हेंबरला मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाच्या व आदिवासी विकास विभागाचा अधिकाऱ्यांची भेट घेऊन ऑगस्टपासून थकीत वेतनाबाबत पाठपुरावा केला. वेतन अधीक्षक शरद चव्हाण, संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर नांद्रे यांनी ९ नोव्हेंबरला दिवसभर वेतनाचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करून तसे पत्र काढायला भाग पाडले. 
 
लेखाशिर्ष १९०१ संदर्भात ४ नोव्हेंबर ला टीडीएफचे सहकार्यवाह डॉ. एन. डी. नांद्रे यांच्यासह आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या व आदिवासी विकास विभागाचा अधिकाऱ्यांची भेट घेऊन ऑगस्टपासून थकीत वेतनाबाबत पाठपुरावा सुरू होता. आज दिवसभर सतत पाठपुरावा केल्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी राज्यातील १९०१ या हेड साठी आज पाच कोटी मंजूर केले. त्यांपैकी नंदूरबार जिल्ह्यातील वेतनासाठी सव्वा कोटींचा निधी दिल्याचे पत्र दिले. 
- प्रभाकर नांद्रे, जिल्हाध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघटना नंदूरबार 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur secondary school teacher payment issue closed