वाळू वाहतूकीला बंदी...तरी गुजरातमधून येत आहे वाळूच्या ट्रकांचे लोंढे !

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

गुजरात राज्यातून जिल्हामार्गे महाराष्ट्रात वाळू वाहतूक केली जाते. ही वाहतूक कोरोना संक्रमित भागात होत असल्याने जिल्हाधिकारींनी बंदी घातली आहे. 

 नवापूर : नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीला बंदी असताना गुजरातमधून जिल्हामार्गे वाळून नेली जात असल्याचे आज येथे उघड झाले. नवापूर हद्दीत पोलिस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करून वाळूचे तेरा ट्रक जप्त केले असून ते तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले आहेत. प्रत्येक ट्रकमध्ये किमान वीस टन वाळू असल्याचे सांगण्यात आले. 

गुजरात राज्यातील तापी नदीमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. त्याचा लिलाव करून गुजरात राज्यातून जिल्हामार्गे महाराष्ट्रात वाळू वाहतूक केली जाते. ही वाहतूक कोरोना संक्रमित भागात होत असल्याने जिल्हाधिकारींनी बंदी घातली आहे. 
बाहेरील राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळू किंवा रेतीची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्हांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. नवापूर हद्दीत पोलिस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करून असे तेरा ट्रक पकडले आहेत. वाळू वाहतूक नियमानुसार करण्यात येत आहे, सर्व प्रकारची रॉयल्टी भरली आहे असे वाहतूक करणाऱ्या चालकांनी सांगितले. मात्र जिल्हाबंदीचे आदेश मोडून ही वाहतूक होत असल्याने आता आपत्तीनियंत्रण कायद्यानुसार कारवाई कऱण्यात येते किंवा कसे हे उद्या समजेल. 

गुजरात राज्यातील निझर येथून वाळू घेऊन जात असलेल्या १३ ट्रकला नवापुर पोलिसांनी नवरंग रेल्वे गेट जवळ पकडून तहसील कार्यालय परिसरात जमा केले. गुजरातमधील निझर येथून औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे, पुणे, लातूर याठिकाणी वाळूचे भरलेले ट्रक जात असताना ही कारवाई करण्यात आलेली आहे. 

गुजरातमधील वाळू वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था होत आहे. वाहतूक करताना अधिक वेगाने वाहतूक होत असल्याने वाळू वाहतूकीबाबत सामान्य नागरिकांचा रोष वाढला आहे. तळोदा-नंदुरबार मार्गावर वाळू वाहतूकदारांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्याऐवजी अडथळा होईल अशी परिस्थिती निर्माण केली. या बाबी लक्षात घेता वाळू वाहतूकीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूक बंदी केली आहे. 

तहसीलदार नॉट रिचेबल 
ट्रक मालकांना गाड्या जमा केल्याची माहिती मिळताच त्यांनी नाशिकहून नवापूर गाठले. मात्र कारवाईबाबत 
सायंकाळी तहसीलदार सुनीता जर्हाड यांना संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. तहसील कार्यालयात तहसीलदार उपस्थित नव्हत्या. त्यांच्याशी संपर्क कऱण्याचा प्रयत्न केला असता तो बंद येत होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nawapur Sand transport during district close but Sand trucks are coming from Gujarat