esakal | रुळावरील मेट्रोसेवा ग्रामीण भागापर्यंत पोचवावी 
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

रुळावरील मेट्रोसेवा ग्रामीण भागापर्यंत पोचवावी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिकः शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्यासाठी राज्य शासनाने नुकतेच टायरबेस एलिव्हेटेड नाशिक मेट्रो निओ या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. परंतु नाशिकची गरज लक्षात घेता रुळावर आधारित सेवेसह शहरापेक्षा महापालिकेने महानगर विकास प्राधिकरण अर्थात, एनएमआरडीएच्या त्र्यंबकेश्‍वर, घोटी, दिंडोरी, निफाड, पिंपळगाव, मोहाडी, इगतपुरी भागापर्यंत नियोजन करावे, अशी मागणी उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

देशातील पहिली टायरबेस एलिव्हेटेड मेट्रोसेवा सुरू केली जाणार असून, सुमारे 2100 कोटींच्या प्रकल्पाला नुकतीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महामेट्रोमध्ये 33 किलोमीटर लांबीची मुख्य, तर 26 किलोमीटरच्या पूरक मार्गिकांचा समावेश असून, वीज व बॅटरीच्या आधारे प्रकल्प साकारला जाणार आहे. दोन मुख्य मार्गिकांवर विजेवर आधारित मेट्रो चालविली जाईल. त्यात गंगापूर ते नाशिक रोडदरम्यान 22.5 किलोमीटर लांबीचा मुख्य मार्ग क्रमांक एक असेल. त्यावर 20 स्थानके असतील. गंगापूर ते मुंबई नाका हा दुसरा मार्ग असून, त्याची 10.5 किलोमीटरचा राहील. त्यावर दहा स्थानके निर्माण केली जाणार आहेत. दोन मुख्य मार्गांची क्षमता वाढविण्यासाठी मुंबई नाका ते सातपूर कॉलनी असा 11.5 किलोमीटर व सीबीएस ते नांदूर नाकामार्गे शिवाजीनगर असा 14.5 किलोमीटरच्या मार्गांची बांधणी केली जाणार आहे. यावर बॅटरीवर आधारित मेट्रो चालविली जाईल. 

राज्य शासनाने टायरबेस मेट्रोसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी हा मार्ग पर्याय म्हणून स्वीकारला पाहिजे. नाशिकमध्ये रुळावर आधारित मेट्रोची गरज आहे. मेट्रोची मर्यादा फक्त शहरी भागापुरते नसावे. उलट ग्रामीण भागापर्यंत पोचविल्यास सध्या प्रस्तावित मार्ग त्यात समायोजित करता येतील. भविष्यात नाशिक शहरापासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर नागरी वस्ती वाढणार असल्याने तेथपर्यंत रुळ आधारित मेट्रो चालविणे गरजेचे आहे. भविष्यात आर्थिक तरतूद केल्यास खर्च वाढेल, त्यापेक्षा आतापासूनच नियोजन करणे गरजेचे असल्याचे उद्योजक संजय सोनवणे यांनी "सकाळ'कडे मत व्यक्त केले. 

नाशिक शहरापासून 30 ते 40 किलोमीटर दूर असलेल्या भागात भविष्यात नागरिक राहण्यास पसंती देणार आहेत. त्यामुळे येथपर्यंत मेट्रोचे जाळे नेण्याची आवश्‍यकता आहे. उलट शहरी भागापेक्षा भूसंपादन व अन्य तांत्रिक अडचणी येणार नाहीत. 
- संजय सोनवणे, उद्योजक 

loading image
go to top