पाचोऱ्यात ‘कोरोना’चे ढग होताहेत गडद 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

पाचोरा येथील कोरोनाबाधितांची संख्या पाच झाली आहे. बाधितांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून, तिघांवर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ‘क्वारंटाइन’ केलेल्यांनी नियम व सूचनांचे पालन करावे. घराबाहेर पडू नये, बाहेर जाणे आवश्यकच असेल तर मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करून स्वतःसह इतरांना सुरक्षित ठेवावे. 
- राजेंद्र कचरे, प्रांताधिकारी, पाचोरा 

पाचोरा : शहरावरील ‘कोरोना’चे ढग दिवसागणिक गडद होत आहेत. आतापर्यंत पाच जण बाधित झाले असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. स्टेट बँक परिसरातील मृताच्या कुटुंबातील आणखी दोघांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने खळबळ उडाली आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील ६४ जणांना ‘क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. पालिका कर्मचारी मृत झाल्यानंतर त्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने पालिकेच्या २२ कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले असलेस तरी काळजी घ्या, घरात राहा व घाबरू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 
येथील स्टेट बँक परिसरातील बाधित मृत वृद्धाच्या कुटुंबातील १७ सदस्यांना जळगाव येथे तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यापैकी दोघांना ‘कोरोना’ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. त्यामुळे बाधितांची संख्या पाचवर गेली आहे. तसेच ६४ जणांना येथील मंगल कार्यालयात ‘क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. मृत पालिका कर्मचाऱ्याचा अहवालही ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर पालिकेच्या २२ कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी ताब्यात घेऊन त्यांना निगराणीत ठेवण्यात आले आहे. आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ व डॉ. अमित साळुंखे यांनी दोन दिवसांपूर्वी १५ जणांचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले होते. स्टेट बँक परिसरातील मृत वृद्धाच्या कुटुंबातील १७ जणांना ‘क्वारंटाइन’ करण्यात आले असून, त्यांचे कनेक्शन मालेगाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मृतास मणक्यांचा त्रास असल्याने त्यांचे उपचारासाठी मालेगावी येणे- जाणे सुरू होते. तसेच सिंधी कॉलनीतील ज्या रहिवाशावर जळगावला रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्याच्या कुटुंबातील व संपर्कातील १३ जणांना ‘क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. या बाधित व्यक्तीचे कनेक्शन पुण्याशी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची आई पुण्याहून परतली होती. त्यातून ही लागण झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

तपासणी पथकास विरोध 
प्रशासनातर्फे सध्या २७ जणांचे तपासणी पथक तयार करण्‍यात आले असून, या पथकातील सदस्य घरोघरी जाऊन नोंदणी करीत आहेत. बाहेरपुरा, रसूलनगर व कुर्बाननगर या बाधित व प्रतिबंधित भागात तपासणी पथकाच्या सदस्यांना रहिवाशांकडून माहिती देण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळे या सदस्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, तहसीलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ, डॉ. अमित साळुंखे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले आदींनी घटनास्थळी जाऊन तपासणी पथकाला विरोध करणाऱ्यांची समजूत घातली. पथकाचे सदस्य जी माहिती विचारत आहेत, ती त्यांना व्यवस्थितपणे द्यावी, हा सर्व प्रकार नागरिकांच्या भल्यासाठी आहे असे सांगून तपासणी पथकाला विरोध केल्यास जळगावला पाठवून तपासणी करण्यात येईल, असा इशारा दिला. त्यानंतर मात्र रहिवाशांनी पथकाला सहकार्य केले. 

पालिका कर्मचारी निगराणीत 
पालिका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने पालिकेच्या २२ कर्मचाऱ्यांना १५ दिवसांसाठी श्री समर्थ लॉन्समध्ये ‘क्वारंटाइन’ करून त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. डॉ. वाघ व डॉ. साळुंखे यांनी त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले आहेत. दरम्यान, शहर व परिसरातील सर्व व्यवहार तीन दिवसांपासून कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवाही ‘लॉक’ असून, शहराच्या प्रमुख रस्त्यांवर व चौकात पोलिस व माजी सैनिकांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. शहर व तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी दीड महिन्यापासून कोटा येथे अडकून पडले होते. शासनाने त्यांना परत आणण्यासंदर्भात कार्यवाही केल्याने हे विद्यार्थी घरी परतले आहेत. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora corona virus two case open