एका एकरात साडेपाच लाखाचे मिरचीचे उत्पन्न 

संजय पाटील
Tuesday, 17 March 2020

बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या मदतीने एक एकर शेतात मिरची पिकाची लागवड केली. वेळोवेळी मशागत व फवारणी व उत्तम संगोपन केल्यामुळे मला विक्रमी उत्पादन शेतात काढता आले. गावातील इतरांनी देखील माझ्यासारखी शेती करण्याचे ठरविले व त्यांनी शेतात मिरची लागवड केली आहे. 
- प्रमोद गोपीचंद पाटील, शेतकरी- दगडीसबगव्हाण (ता. पारोळा). 

पारोळा : दगडीसबगव्हाण (ता. पारोळा) येथील शेतकरी प्रमोद गोपीचंद पाटील यांनी बारामती येथील कृषी प्रदर्शनास भेट दिली होती. याचा त्यांनी लाभ घेतला असून, एका एकरात साडेपाच लाख रुपये मिरचीचे उत्पन्न काढले आहे. परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी त्यांच्या विक्रमी उत्पादनाचे कौतुक केले आहे. 

हेपण पहा -मजुरांद्वारे लागवडीऐवजी कांद्याची चक्क पेरणी! 

दगडीसबगव्हाण (ता. पारोळा) येथील प्रमोद गोपीचंद पाटील यांनी एका एकरात जुलै महिन्यात लावलेली मिरचीच्या लागवडीत आजवर साडेपाच लाखाचे विक्रमी उत्पन्न त्यांनी काढले आहे. एप्रिल, मे पर्यंत मिरचीचा तोडा चालणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. यावेळी शेतकरी प्रमोद पाटील यांचे लोकनियुक्त सरपंच संगीता पाटील, सामाजिक कार्यकर्ता नंदलाल पाटील, छोटू पाटील, लहू पाटील, विकास संस्‍थेचे अध्यक्ष संभाजी पाटील, काळू पाटील, सुभाष पाटील, माजी चेअरमन शिवाजी पाटील, रवींद्र पाटील, अशोक पाटील, साहेबराव पाटील व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. 

कृषी प्रदर्शनाचा अनुभवाचा लाभ 
दगडी सबगव्हाण येथील शेतकऱ्यांचा अभ्यासदौरा काढण्यात आला होता. या शेतकऱ्यांना बारामती येथे कृषीप्रदर्शनात पिकाची लागवड, संगोपन, बाजारपेठ याबाबत कृषी तज्‍ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. याचा अनुभव घेत प्रमोद गोपीचंद पाटील यांनी आपल्या शेतात एका एकरात मिरची या पिकाची जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली होती. उत्तम संगोपन व मशागतीमुळे आजवर ते एप्रिल ते मे पर्यंत ही मिरची निघणार आहे. 

मेळाव्यात सहभागी व्हावे 
देश एकविसाव्या शतकात वाटचाल करीत असताना देखील बऱ्याच शहरी व ग्रामीण भागात पारंपरिक शेती केली जाते. शेतात वारंवार तेच तेच पीक व रासायनिक खतांचे वाढते प्रमाणामुळे शेतातील उत्पन्न घटले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करून कृषीप्रदर्शन वा कृषी मेळाव्यात सहभागी झाले तर निश्चितच त्याचा फायदा होईल, असे प्रयोगशील शेतकऱ्यांनी सांगितले. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora Pepper farm one ekar aria five lakh ruppise production