esakal | चुलत बहिणीने फुलवले भावाच्या जीवनाचे पुष्प 

बोलून बातमी शोधा

pushpa patil lakshaman patil

नात्याने चुलत बहीण असलेल्या पुष्पा पाटील यांनी भाऊ लक्ष्मण पाटील यांना आपली एक किडणी दान देऊन त्यांच्या जीवनाचे पुष्प फुलविले आहे. बहीण पुष्पाच्या या औदार्याचे कौतुक होत आहे. 

चुलत बहिणीने फुलवले भावाच्या जीवनाचे पुष्प 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : अलीकडच्या स्वार्थी व स्वयंकेंद्री युगात रक्ताच्या नात्यातील माणसे एकमेकांच्या जिवावर उठत असल्याचे आपण पाहतो, ऐकतो अथवा अनुभवतो देखील. किरकोळ स्वार्थासाठी सख्खा भावात बहिणीतही वाद होतात. असे असले तरी कौटुंबिक जिव्हाळा, प्रेम, आपुलकी व माणुसकी अजुनही अबाधित असल्याचे विविध घटनांवरून निदर्शनास येते. असाच प्रकार लक्ष्मण पाटील व पुष्पा पाटील या चुलत भाऊ-बहिणीबाबत सिद्ध झाला आहे.

क्‍लिक करा -पुजेसाठी मागितला कोंबडा...यानंतर पुजाऱ्याने गमावला जीव

जारगाव (ता. पाचोरा) येथील शेतकरी व किराणा व्यावसायिक लक्ष्मण पाटील (वय ५४) यांच्या आजारपणात त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या. उपचारासाठी त्यांनी आपल्या जवळील सर्व शेतजमीनही विकली. किराणा व्यवसायही बंद पडण्याच्या मार्गावर आला. कर्जाचा प्रचंड डोंगर उभा राहिला. परंतु लक्ष्मण पाटील यांनी उपचाराची व जगण्याची उमेद मात्र कमी होऊ दिली नाही. किडणी प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांनी किडणीसाठी शोधाशोध केली. 

पत्नी, सासूही आल्या पुढे 
पत्नी व सासू किडणी देण्यासाठी पुढे सरसावल्या. मात्र, त्यांच्या वैद्यकीय तपासणीअंती त्यांच्या किडणीचे प्रत्यारोपण शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता मरण हा एकच पर्याय आहे, ही मानसिकता पाटील कुटुंबीयांनी केली होती.  

भेटण्यासाठी आल्या अन्‌ घेतला निर्णय 
वलवाडी (ता. भडगाव) येथे वास्तव्यास असलेली लक्ष्मण पाटील यांची चुलत बहीण पुष्पा पाटील या भावाला आजारपणात पाहण्यासाठी आल्या असता, त्यांना ही सर्व माहिती समजली. तेव्हा त्यांनी क्षणाचाही विचार न करता, चुलत भावाला किडणी देण्याचा विचार व्यक्त केला. त्याला कुटुंबीयांनीही संमती दिल्यानंतर पुष्पा पाटील यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. त्यात त्यांच्या किडणीचे प्रत्यारोपण करणे शक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर किडणी प्रत्यारोपणाच्या हालचाली सुरू झाल्या. 

गुजरातमध्ये झाले प्रत्यारोपण 
गुजरात मधील नडियाद येथील रुग्णालयात पुष्पा पाटील यांना दाखल करण्यात आले व तेथे त्यांची किडणी काढून तिचे लक्ष्मण पाटील यांच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आले. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून दोघा बहीण भावांची प्रकृती सुधारली आहे. पुष्पा पाटील यांनी आपल्या चुलत भावाला किडणी देऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाचे पुष्प फुलविले आहे.