यशस्वी पीक पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी : कृषिमंत्री दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

पारोळा : शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळावे म्हणून कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. शेतकरीदेखील अनुभवाच्या आधारे पीक पद्धतीत बदल करून अधिक उत्पादन घेतात. इतर शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी अशा यशस्वी पीक पद्धतींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.

पारोळा : शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळावे म्हणून कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. शेतकरीदेखील अनुभवाच्या आधारे पीक पद्धतीत बदल करून अधिक उत्पादन घेतात. इतर शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी अशा यशस्वी पीक पद्धतींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.
दळवेल ता,पारोळा  येथे शिवार पाहणीच्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चिमणराव पाटील, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, अमळनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर आदी उपस्थित होते.
ना.भुसे यांनी भगवान पाटील आणि परमेश्वर पाटील यांच्या शेताची पाहणी केली. शेतातील मक्याच्या उत्पादनाचा अभ्यास करून इतरही शेतकऱ्यांना असे उत्पादन करण्यास प्रोत्साहन देण्याची सूचना त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना ते म्हणाले, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली आहे. येत्या 15 दिवसात ही रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असलेले आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या बैठकाही घेण्यात आल्या असून लवकरच मंत्री मंडळाला अहवाल सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शेतरस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून करण्यात येईल आणि कृषी विभागातील पदे लवकरच भरण्यात येतील, असेही श्री. भुसे म्हणाले.
 यावेळी कृषिमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत रोटोव्हेटर आणि अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. हरी गवळी आणि मनीषा गिरासे याना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत बंदिस्त शेळी पालनासाठी 11 शेळींचे युनिट देण्यात आले. यावेळी  एरंडोल पारोळा मतदार संघाचे आ चिमणराव पाटील यांनी  सरकार हे शेतकऱ्यांचा हिताचे निर्णय घेण्यासाठी  प्रयत्नशिल आहे.शेतकर्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भुमिका आपली राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी बाजार समिती संचालक चतुर पाटील,मधु पाटील,शेतकरी संघटनेचे किशोर पाटील,  दीपक गिरासे ,तालुका कृषी अधिकारी ,मंडळ अधिकारी ,महसूल अधिकारी ,कर्मचारी व शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी शेतकरी संघटने ने विविध मागण्यांचे निवेदन मंत्री दादा भुसे यांना दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola minister dada bhuse farm tour