फिरत्या 349 पशुवैद्यकीय चिकित्सालयाची योजना कागदावर 

संतोष विंचू ः सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

येवला ः पशुधनाच्या दारापर्यंत वैद्यकीय सेवा पोचविण्यासाठी सरकारने 349 फिरत्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाची स्थापना करण्याचा घेतलेला निर्णय कागदावर राहिलाय. सद्यःस्थितीत वाढलेले पशुपालक अन्‌ दुग्धोत्पादनाच्या जोडीला आजार बळावत चाललेत. मात्र त्याच्या प्रमाणात पशू आरोग्यसेवेचा विस्तार होत नसल्याने जनावरांना उपचारासाठी नेणे आवाक्‍याच्या बाहेर झाल्याने गावांमधून पशू आरोग्य सुविधेचा प्रश्‍न जटिल बनलाय. 

येवला ः पशुधनाच्या दारापर्यंत वैद्यकीय सेवा पोचविण्यासाठी सरकारने 349 फिरत्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाची स्थापना करण्याचा घेतलेला निर्णय कागदावर राहिलाय. सद्यःस्थितीत वाढलेले पशुपालक अन्‌ दुग्धोत्पादनाच्या जोडीला आजार बळावत चाललेत. मात्र त्याच्या प्रमाणात पशू आरोग्यसेवेचा विस्तार होत नसल्याने जनावरांना उपचारासाठी नेणे आवाक्‍याच्या बाहेर झाल्याने गावांमधून पशू आरोग्य सुविधेचा प्रश्‍न जटिल बनलाय. 

   पशुधनाचे आजार वाढल्याने पशुधन वाचविण्यासाठी आणि पशुपालकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक तालुक्‍यात फिरते चिकित्सालय सुरू करण्याची गरज तयार झाली. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे वडेल शिवारात (ता. मालेगाव) 400, तर ममदापूरमध्ये (ता. येवला) दोनशेहून अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुधनाच्या आरोग्याचा विषय किती गंभीर बनला आहे, याचे चित्र स्पष्ट होते. मेंढ्यांना वेळेत उपचार मिळाले असते, तर कदाचित त्या वाचल्याही असत्या. ग्रामविकासांतर्गत पशुवैद्यकीय विभाग कार्यरत असून, मोठ्या लोकसंख्येच्या गावात पशुवैद्यकीय दवाखाने सुरू आहेत. त्यांची यंत्रणा पुरेशी ठरत नसल्याने कृत्रिम रेतन, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व तपासणी, औषधोपचार, लाळ खुरकत प्रतिबंध आदींचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटिल बनत चालले आहेत. पशुधन आजारी पडल्यावर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे लागते. मात्र जनावराला चालता येत नसल्यास वाहन करून उपचारासाठी न्यावे लागते. 

      दवाखाना व दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधेमुळे पशुपालकांच्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा घेऊन जाण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याचाच एक भाग म्हणून फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन करण्याचे ठरवले. फेब्रुवारीमध्ये राज्यात प्रायोगिक तत्त्वावर 80 तालुक्‍यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन करण्याचे धोरण स्वीकारले गेले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध उपकरणांची उपलब्धता करून देत वाहनचालक व वाहनाचा खर्च मंजूर करण्यात आला. जिल्ह्यातील बागलाण व देवळा या दोन तालुक्‍यांची त्यासाठी निवड झाली. हा प्रयोग म्हणावा तेवढा यशस्वी झालेला नाही. 

शेतकऱ्यांकडे उपलब्ध पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय सेवेची सुविधा अत्यल्प आहे. त्यामुळे अनेकदा मेंढ्या मृत होतात. सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याची संख्या मोजकी असल्याने प्रत्येक गावात पशुवैद्यकीय सुविधा मिळत नाही. त्यामुळे खासगी डॉक्‍टरांचा शोध घ्यावा लागतो. 
- दत्तात्रय वैद्य (अध्यक्ष, मल्हार सेना, येवला) 
-------------- 
जिल्ह्यातील पशुवैद्यकीय सेवा 
- दवाखाना श्रेणी एक ः 108 
- दवाखाना श्रेणी दोन ः 133 
- जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय ः एक 
- तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय ः सहा 
- राज्यस्तरीय संस्था पशुवैद्यकीय श्रेणी दोन ः 15 
- फिरते पशुवैद्यकीय दवाखाने ः दोन 
- तपासणी नाका ः एक 
एकूण ः 266 

तालुकानिहाय आरोग्य संस्था 
मालेगाव ः 32 सिन्नर ः 20 नाशिक ः 16 
चांदवड ः 17 पेठ ः नऊ दिंडोरी ः 21 
नांदगाव ः 18 सुरगाणा ः 13 इगतपुरी ः 14 
येवला ः 17 कळवण ः 15 बागलाण ः 25 
निफाड ः 25 त्र्यंबकेश्‍वर ः 14 देवळा ः दहा  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news policy in paper