प्रकाशा येथे शंभर बेडचे मल्टी स्पेशल हॉस्पिटल..सुरतच्या विश्व कल्याण ग्रुपचा पुढाकार ! 

धनराज माळी
Monday, 27 July 2020

हॉस्पिटलचा लाभ जिल्ह्याला तसेच सीमेलगत असलेले गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील जनतेला होणार आहे. प्रामुख्याने हॉस्पिटलमध्ये २० तद्यं डॉक्टरांचे पथक कार्यान्वित राहणार असणार आहे.

कहाटूळ  ः प्रकाशा(ता.शहादा) येथे विश्वकल्याण ग्रुप सुरततर्फे १०० बेडचे मल्टीस्पेशालिस्ट सेवाभावी हॉस्पिटल निर्माण करण्यात येणार आहे.अत्यंत अल्पदरात परिसरातील रुग्णांना सेवा देण्यात येणार आहे. 

दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे शहादा तालुक्यातील तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले प्रकाशा गावात विश्वकल्याण ग्रुप (सुरत गुजरात तर्फे १०० बेडचे विश्वकल्याण मल्टीस्पेशलिटी सेवाभावी हॉस्पिटल नावाने लवकरच हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या हॉस्पिटलचा लाभ जिल्ह्याला तसेच सीमेलगत असलेले गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील जनतेला होणार आहे. प्रामुख्याने हॉस्पिटलमध्ये २० तद्यं डॉक्टरांचे पथक कार्यान्वित राहणार असणार आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी, ॲलोपथी, सुसज्ज प्रयोगशाळा,औषधालय,अतिदक्षता विभाग ,अत्यावश्यक सेवा,रुग्णवाहिका,ब्लड बँक,सर्वसोयी युक्त असलेली प्रशस्त हॉस्पिटलचे एक वर्षाच्या आत लोकवर्गणीतून व विश्व कल्याण ग्रुप यांच्यावतीने सेवाभावी हॉस्पिटलचे प्रकाशा येथील वैजाली रस्त्यालगत बांधकामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी देखील उस्फूर्त प्रतिसाद देत विश्वकल्याण ग्रुपचे कौतुक केले आहे. 

विश्वकल्याण ग्रुप सुरत तर्फे अनोखी मानव सेवा 

विश्वकल्याण ग्रुप (सुरत ) तर्फे ॲम्बुलन्स सेवा तसेच निःशुल्क डिपॉझिट बेसवर हॉस्पिटल बेड ,हॅंडीकॅप स्टिक, वॉकर, व्हिलचेअर आदी सेवा गरजूंना मागच्या तीन वर्षापासून परिसरात निःशुल्क देण्यात येत आहे. मेडिकल साहित्य महाग असल्यामूळे बाजारातून खरेदी करणे शक्य होत नसल्याने गरजूंना सोयीचे ठरत आहे. 
वृक्षारोपणाला व गो रक्षणाला महत्व 

विश्वकल्याण ग्रुपच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात निःशुल्क घरपोच वृक्ष सेवा त्याचबरोबर जन्मदिवसानिमित्त वृक्षारोपण, भागवत कथा निमित्त बेलपत्र झाडांचे वाटप, लग्नप्रसंगी वृक्षारोपण, त्याचबरोबर गो शाळेचे निर्माण आदी उपक्रम राबविले जात आहेत. वरूळ कानडी व शहादा येथे गो शाळा देखील सुरु आहेत. त्याचबरोबर झाडे लावा, झाडे जगवा या घोष वाक्याचे आचरण करीत यावर्षी १५ जून ते २१जुलै पर्यंत शहादा तालुक्यात ३१ हजार वृक्ष वाटप देखील ग्रामीण आणि शहरी भागात करण्यात आलेली आहे. विश्वकल्याण ग्रुपचे उपक्रम सामाजिक भावनेतून राबविले जात आहेत. या ग्रुपचे हे कार्य जिल्ह्यासाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. 
 

 

"मी मागच्या सात वर्षापासून विश्वकल्याण ग्रुप तर्फे सेवाभावी कार्य करत आहे. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यासाठी मागच्या तीन वर्षापासून वृक्षारोपण ,गो संरक्षण हॉस्पिटलचे साहित्य वाटप ही सेवा देत आहे . भविष्याचे हित लक्षात घेऊन प्रकाशा येथे १०० बेडचे भव्य व सर्व सोयीयुक्त सेवाभावी हॉस्पिटल एका वर्षभरात उभारण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यात प्रकाशा येथे ओपीडी देखील सुरू करण्यात येणार आहे." 
-जगदीश पटेल , 
सेवक विश्वकल्याण ग्रुप,सुरत 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Prakasha One hundred bed multi-special hospital at prakasha