पाया खोदता खोदता अचानक मडके दिसले; आणि मडक्यात निघाली राणी व्हिक्टोरियाची मुद्रा !

भटेराम वाडिले
Wednesday, 14 October 2020

दोन-तीन फूट खोदकाम करत असताना अचानक एक मातीचे मडके दिसले. मडके उघडून पाहिले आसता, त्यात चांदीसदृश नाणी आढळली.

प्रकाशा : येथील सोनार गल्लीत एका घराच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम सुरू असताना पुरातन काळातील चांदीची १०० नाणी आढळली. साधारण १८५० ते १८९० या कालावधीतील या नाण्यांवर व्हिक्टोरिया राणीची छबी आहे. एकूण एक हजार २०० ग्रॅम वजनाची ही सर्व नाणी महसूल प्रशासनाने ताब्यात घेतली असून, प्रशासकीय कारवाई सुरू आहे. 

प्रतिकाशी मानल्या जाणाऱ्या प्रकाशा (ता. शहादा) येथील सोनार गल्लीत शांताबाई कथ्थू मोरे भावाकडे राहतात. त्यांच्या घरासमोरच शांताबाईंच्या नावे मध्यवस्तीत घराची पडीत जागा आहे. त्या जागेत घरबांधकामासाठी पाया खोदण्याचे काम सुरू होते. दोन-तीन फूट खोदकाम करत असताना कृष्णा रामा सोनवणे व शिवा कृष्णा सोनवणे यांना अचानक एक मातीचे मडके दिसले. त्यांनी लगेच शांताबाईंचे भाऊ तुकाराम मोरे यांना याबाबत सांगितले. मडके उघडून पाहिले आसता, त्यात चांदीसदृश नाणी आढळली. तपासले असता ती चांदीचीच असल्याची खात्री झाली. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. घटनास्थळी सरपंच सुदाम ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक कैलास माळी, हवालदार अरुण सैंदाणे, गौतम बोराळे, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, ग्रामविकास अधिकारी बाळू पाटील, तलाठी डी. एम. चौधरी आदी तत्काळ दाखल झाले, तसेच गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनीही तेथे गर्दी केली. पोलिसांनी सर्व नाणी महसूल प्रशासनाकडे सुपूर्द केली असून, प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. 

पुरातन चलनी नाणी 
भारतीय चलनातील १८५० ते १८९० या काळातील या नाण्यांवर एका बाजूला व्हिक्टोरिया राणीची मुद्रा व VICTORIA EMPRESS आणि दुसऱ्या बाजूस ONE RUPEE अशी अक्षरे मुद्रित केलेली आहेत. यापूर्वीही गावात ठिकठिकाणी खोदकाम करताना पुरातन काळातील मातीच्या वस्तू, मूर्ती सापडल्या आहेत. यावरून हे गाव प्रचंड उलथापालथीनंतर पुनर्स्थापित झाले असावे, या मुद्द्याला दुजोरा मिळतो. 

गावात खोदकाम करताना चांदीसदृश नाणी सापडली. पंचनामा करून रक्कम निश्‍चित केली जाईल. सर्व नाणी ट्रेझरीत स्वतंत्र सीलबंद कक्षात ठेवली जातील. हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल. त्यांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल. पुरातत्त्व विभागाकडेही पाठपुरावा केला जाईल. 
-डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, शहादा 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news prakasha While digging the foundation of the house, old silver coins were found