esakal | खासगी हॉस्पिटलकडून कोरोनाबाधितांकडून अवाजवी बिल आकारणी 
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी हॉस्पिटलकडून कोरोनाबाधितांकडून अवाजवी बिल आकारणी 

शहरातील मालेगाव रोडवरील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल एका रुग्णाकडून अवाजवी बिल आकारणी करण्यात आल्याची तक्रार महापालिकेच्या भरारी पथकाला प्राप्त झाली होती.

खासगी हॉस्पिटलकडून कोरोनाबाधितांकडून अवाजवी बिल आकारणी 

sakal_logo
By
रमाकांत गोदराज

धुळे ः कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या शहरातील एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने अवाजवी बिल आकारणी केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या भरारी पथकाने संबंधित हॉस्पिटलमध्ये प्रकाराबाबत तपासणी केली. पथकाला अवाजवी बिल आकारल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित हॉस्पिटलच्या संचालकांना याबाबत समज देऊन नियमाप्रमाणे बिल आकारण्याचे निर्देश दिले. 

कोरोनाबाधित (कोविड-१९) रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांना वाजवी व नियमानुसार शुल्क आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाने यासाठी दर निश्‍चितीदेखील केली आहे. मात्र, तरीही काही खासगी हॉस्पिटल्स रुग्णांकडून अवाजवी बिल वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी भरारी पथक नियुक्त केले आहे. शहरातील मालेगाव रोडवरील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल एका रुग्णाकडून अवाजवी बिल आकारणी करण्यात आल्याची तक्रार महापालिकेच्या भरारी पथकाला प्राप्त झाली होती.

त्यानुसार पथकाने शनिवारी (ता.१५) संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी केली. सामायिक रुममध्ये दाखल दोंडाईचा येथील एक रुग्ण व इतर रुग्णांच्या बिलांच्या रकमेत तफावत आढळली. संबंधित रुग्णाला अवाजवी बिल आकारल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित हॉस्पिटलच्या चालकांना समज देण्यात आली. वैद्यकीय बिल नियमाप्रमाणे आकारण्याचा आदेशही पथकाने दिला. याबाबत संबंधित रुग्ण व संस्थाचालकांचे लेखी घेण्यात आले. महापालिकेच्या या कार्यवाहीबाबत संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, संबंधित हॉस्पिटलला मनपा व शासनाच्या आदेशानुसार निश्‍चित केलेले दरपत्रक दर्शनी भागावर लावण्याबाबतही भरारी पथकाने निर्देश दिले. महापालिकचे मुख्य लेखाधिकारी नामदेव भामरे, लेखापाल प्रदीप नाईक, भांडारपाल राजेंद्र माईनकर, फार्मासिस्ट खलील शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
 

संपादन-भूषण श्रीखंडे

loading image