मास्क, सॅनिटायझरचा पुरेसा साठा... मेडिकल असोसिएशन, अन्न, औषध प्रशासनाची माहिती 

मुकेश पटेल
Tuesday, 7 April 2020

बाजारात मास्क व सैनीटायझरचा तुटवडा नाही असे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष राजेंद्र डागा यांनी सांगितले. 

पुरुषोत्तमनगर  : जिल्ह्यात मास्क आणि सैनिटायझरचा कुठेही तुटवडा नसून आवश्‍यकतेएवढा पुरेसा साठा आहे अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायआयुक्त व्ही.टी.जाधव आणि नंदुरबार जिल्हा मेडिकल असोसिएशनतर्फे देण्यात आली. 

कोरोनाला प्रतिबंधासाठी जिल्हाभरात मास्क व सॅनीटायझरला मागणी अचानक वाढली आहे. सुरवातीला एकदोन दिवस थोडी अडचण होती, मात्र त्यात लगेच सुधारणा करण्यात आली. आजमितीस जिल्ह्यात कुठेही सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा नाही असे स्पष्ट करण्यात आले. 

सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून या विषाणूपासून बचावासाठी शासनाने मास्क व सेनीटायझर चा उपयोग करण्यास सांगितले आहे त्यानुसार मागणी जास्त वाढल्याने पंधरा ते वीस दिवसांपूर्वी बाजारात मेडिकल स्टोअरवर दोन्ही वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता, परंतु शासनाने मास्क व सॅनिटायझर जीवनावश्यक वस्तू व ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डरमध्ये समाविष्ट केल्यानंतर भारतीय कंपन्यांनी त्यांचे उत्पादन वाढवून त्या लगेच घाऊक विक्रेत्यांपर्यंत उपलब्ध केल्या. त्यामुळे आता बाजारात मास्क व सैनीटायझरचा तुटवडा नाही असे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष राजेंद्र डागा यांनी सांगितले. 

अन्न व औषध प्रशासन धुळे व नंदुरबार विभाग तसेच पोलीस प्रशासन नंदुरबार जिल्हा यांच्याकडून माल वाहतुकिस संपूर्ण सहकार्य मिळत असून तशा आशयाचे पत्र जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नंदुरबार जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असो.ला दिले, त्याबद्दल त्यांचे संघटनेतर्फे आभार मानण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात संपूर्ण सहकार्य असून कुणीही मास्क व सेनिटायझरचा काळाबाजार तसेच चढ्या दराने विक्री करू नये अन्यथा आपणास शासकीय कारवाईस सामोरे जावे लागेल असे निर्देश देण्यात आले आहेत. 
महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनकडून मेडिकल व्यावसायिकांना ओळखपत्र पुरवण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्हा व शहादा पोलिस प्रशासन व शहादा नगरपालिका प्रशासनाकडून मेडिकल व्यवसायिकांना औषधी वाहतुकीस सहकार्य मिळत आहे असेही यावेळी संघटनेकडून सांगण्यात आले. 

तक्रार असल्यास संपर्क करा 
नंदुरबार जिल्ह्यात कुणासही काही अडचण आल्यास किंवा काही तक्रार असल्यास आपण जिल्हा संघटनेचे किंवा आपल्या तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता असेही संघटनेतर्फे सांगण्यात आले. नंदुरबार, अक्कलकुवा- जिल्हाध्यक्ष-राजेंद्र डागा- ९४२३४९६७५९. शहादा, तळोदा, धडगाव- ललित छाजेड(PRO)- ९४२२७७११४१. विजय चव्हाण तळोदा- ९९७०३६२३९२ तसेच आशिष छाजेड -९९२३०६१४६७ व मुकेश पटेल- ७०२०१७२९३२. 

सद्यस्थितीत जिल्ह्यात मास्क व सेनीटायझर चा पुरवठा सुरळीत चालू असून घाऊक विक्रेत्यांकडे दोघेही वस्तूंच्या मुबलक साठा उपलब्ध आहेत. औषध विक्रेतेही सुरळीत विक्री करत असून यापुढेही त्याबाबत प्रयत्नशील राहतील. 
- व्ही. टी. जाधव. असिस्टंट कमिशनर, अन्न व औषध प्रशासन, धुळे-नंदूरबार. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news purshotamnagar Adequate storage of masks, sanitizers ... Medical Association, Food, Drug Administration Information