यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर आनंद 

राजेंद्र मगरे
Monday, 17 February 2020

नाशिक येथे विभागीय आढावा बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनपूर धरण्यासाठी कोटी रुपये निधी उपलब्ध करून देत असल्याची घोषणा केली आहे. 

आमलाड : तळोदा तालुक्यातील धनपूर धरणासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली. त्यामुळे धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचा मार्ग मोकळा झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेपण पहा - सत्तरच्या दशकातील कोरडवाहूत डोलतोय गहू 

२७२ हेक्टरला लाभ 
धनपूर धरण मागील वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरत आहे .मात्र पाटचाऱ्यांअभावी शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग होत नाही. पाटचाऱ्याचे काम निधी अभावी रखडलेले आहे.आता निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने पाटचाऱ्यांचे काम युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना पाणी बांधापर्यत पोहचविणे आवश्यक आहे.याव्दारे धरण क्षेत्रातील २७२ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.या क्षेत्रातील शेतकरी हा मुख्यतः आदिवासी आहे. 

अनेक आंदोलनानंतर काम पूर्ण 
धनपूर धरण सातपुडा पर्वतातून उगम पावणार्‍या निझरा या नदीवर बांधण्यात आले आहे. ही नदी पुढे बोरद, मोड, खेडले, पिसावर अशी वाहत जाऊन पुढे तापी नदीस मिळते. धनपूर धरण साकारावे म्हणून १९९६ पासून आजतागायत, मोर्चे, उपोषण, निवेदन, घेराव, रस्ता रोको आदी मार्गांनी शेतकऱ्यांनी आंदोलने केली. त्यानंतर सुमारे २५ वर्षानंतर शेतकऱ्यांचे स्वप्न साकार झाले. धनपूर धरण बांधण्यात आले. मात्र धरण पूर्ण होऊन दोन वर्ष होत आले. धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी पाटचाऱ्यांचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यावर पाटचाऱ्यांचे बांधकाम करण्याची गरज आहे. त्यासाठी दोन वर्षापासून निधी उपलब्ध होत नव्हता. 

शेतकऱ्यांचा आथिर्क विकासाला चालना 
धरण परिसरातील ७० टक्के आदिवासी शेतकऱ्यांचा जमिनी सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे त्यांची शेती बागायती होऊन विविध पिके घेता येतील.आर्थिकदृष्ट्या त्यांना प्रगती करता येईल व परिसरातील रोजगारासाठी होणारे स्थलांतर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. 

धरणासाठी अनेकांनी केले प्रयत्न 
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांचेकडे स्व. पी. के.अण्णा पाटील यांनी व इतर नेत्यांनी धनपूर धरणाचा प्रस्ताव सादर केला. २६ जानेवारी २००५ ला धनपूर धरण संघर्ष समितीने तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत शिवरकर यांना घेराव घातला. प्रांताधिकारी रीचा बागला यांनी मध्यस्थी करीत धरणाच्या कामाला गती दिली.त्यानंतर विविध अडथळे पार करून धनपूर धरणाचे शेतकऱ्यांचे स्वप्न वास्तवात साकारले.मात्र पाणी बांधापर्यत येऊन शेती सुजलाम सुफलाम होऊन आर्थिक संपन्नता येण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. 

शिवसेनेचा योगा योग 
धनपूर धरण मंजुरीचा वेळेस मनोहर जोशी यांचा रूपाने शिवसेनेचेच मुख्यमंत्री होते. शेतकऱ्यांचा बांधापर्यत धरणाचे पाणी पोहचविणेसाठी निधी उपलब्ध करून देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेचेच. ! हा निव्वळ योगायोग म्हणावा की काय? मात्र निधी मिळविण्यासाठी पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी प्रयत्न केलेत व त्यांच्याच प्रयत्नाने सुसरी प्रकल्प तालुका शहादासाठी एक कोटी पंच्याहत्तर लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news radoda dhanpur dam cm thakre declare aadivasi farmer