यंदाच्या अक्षयतृतीयेला घागर उताणीच !

प्रदीप वैद्य
Tuesday, 14 April 2020

खानदेशासह मध्यप्रदेशात अक्षय तृतीयेसाठी घागर, तृष्णा भागवण्यासाठी माठांना मोठी मागणी असते. घागर व माठ विक्रीसाठी वाहतुकीस परवानगी मिळावी. जेणेकरून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक हातभार लागू शकेल. 
- चिंतामण कुंभार, वाघोड (ता. रावेर)

रावेर : देशभरात असलेल्या लॉकडाऊन मुळे कुंभार समाजावर यावर्षी मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. खानदेशातील घागरी भरण्याचा सण अक्षय तृतिया जवळ येऊनही आणि उन्हाळा सुरू होऊनही गरिबांचे फ्रिज असलेले माठ विक्रीअभावी घरातच पडून आहेत. शासनाने घागरी, माठ विक्रीसाठी वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी कुंभार समाजाकडून होत आहे. 

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा परिणाम अनेक घटकांवर पडत असून, कुंभार समाजासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दिवाळीत पणत्या, देवीच्या मुर्त्या तयार करून कुंभार समाजाच्या कमाईला सुरुवात होते. यानंतर फेब्रुवारी अखेर पासून ते मे पर्यंत गरिबांचे फ्रिज माठ, अक्षय तृतीयेसाठी लागणारी घागर, विवाह समारंभासाठी बेमाथन व कोणी वारले तर अधून मधून लागणारे मडके तयार केले जातात. माठ बनवण्यासाठी लागणारा कोळसा, माती व साहित्य टप्याटप्याने आणून माठ तयार केले जातात. साधारणतः मार्चच्या पंधरवड्यानंतर माठांच्या विक्रीस प्रारंभ होतो. 

तीस टक्के माठ तयार 
गरिबांचे फ्रिज समजल्या जाणाऱ्या माठ विक्रीला मार्चच्या पंधरवड्यापासून सुरुवात होत नाही तोच, देशात 20 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. घरातल्या घरात आपल्या वाड्यात कुंभार बांधवांनी माठ तयार केले. सध्या अक्षय तृतीयेसाठी घागरी तयार करण्याचे काम सुरू आहे. लॉकडाऊनमुळे तीस टक्केच माठ तयार झाले आहेत. 

माठ वाहतुकीसाठी परवानगी द्यावी 
पंधरा दिवसांवर अक्षय तृतिया (आखाजी) येऊन ठेपली आहे. खानदेशासह मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्हा व परिसरात घरोघरी पितरांच्या शांतीसाठी घागरी भरतात. यासाठी कुंभार समाजाने घागरी बनवल्या आहेत. गरिबांचे फ्रिज समजले जाणारे व खऱ्या अर्थाने तृष्णा भागवणारे माठ लॉकडाऊनमुळे घरीच पडून आहेत. 

कुंभार समाजावर आर्थिक संकट 
लॉकडाऊनमुळे माठ विक्री ठप्प झाली आहे. फेब्रुवारी ते मे या चार महिन्याच्या कालावधीत कुंभार समाजाचे पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन असते. यात त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा चालणारा उदरनिर्वाह मुलांचे शिक्षण यासाठी खर्च होत असतो. मात्र यावर्षी केवळ पंचवीस ते तीस टक्के तयार करण्यात आले. शासनाने माठ विक्रीस परवानगी दिल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटू शकतो. अन्यथा या समाजावर भविष्यकाळात उपासमारीची वेळ येऊ शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver akshay trutiya festival corona lockdown