अरब देशात रावेर तालुक्यातील केळी निर्यात सुरु 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 एप्रिल 2020

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी ही परवानगी दिली असून, सुमारे दीडशे बंगाली कुशल मजूर तालुक्यात दाखल झाले आहेत. या सर्वांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांनी केळी कापणी करण्यास सुरुवात केली

रावेर : अखेर तालुक्यातून महिनाभर उशिराने का होईना पण केळीची निर्यात सुरू झाली आहे. सध्या तालुक्यातून दररोज ४-५ कंटेनर्स केळी अरब देशांत निर्यात होत आहे. येत्या आठवड्यात निर्यातीला आधिक गती येईल अशी अपेक्षा आहे. 
केळी निर्यातीसाठी केळीची कापणी करणारा कुशल कामगार वर्ग जिल्हा बंदीमुळे सोलापूर जिल्ह्यात अडकून पडल्यामुळे केळी निर्यात सुरू होत नव्हती. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी ही परवानगी दिली असून, सुमारे दीडशे बंगाली कुशल मजूर तालुक्यात दाखल झाले आहेत. या सर्वांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांनी केळी कापणी करण्यास सुरुवात केली असून, केळीची निर्यात सुरू झाली आहे. तांदळवाडी येथील महाजन बनाना एक्सपोर्ट्स, अटवाडा येथील रुची बनाना एक्सपोर्ट्स आणि तांदलवाडी येथील एकदंत बनाना एक्सपोर्ट्स यांनी ही निर्यात सुरू केली असून लवकरच रावेर येथील महाराष्ट्र बनाना एक्सपोर्टस, जळगाव येथील जैन बनाना एक्सपोर्ट लवकरच आपली निर्यात सुरू करणार आहे. तालुक्यातून दररोज ८०० ते १००० क्विंटल म्हणजे चार ते पाच कंटेनर्स भरून केळी परदेशात निर्यात होत आहे. आगामी काळात सुरू होत असलेल्या रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर इराण, तुर्कस्तान, ओमान या देशात केळीला मोठी मागणी असून निर्यातीची गती वाढणार आहे. 

केळी भावातही वाढ 
दर्जेदार आणि निर्यातक्षम केळी विदेशात जाऊ लागल्याने आणि देशातील बाजारपेठेत देखील केळीची मागणी वाढल्याने काल (ता. १८) आणि आज (ता. १९) तालुक्यात अनेक ठिकाणी बाजार समितीने जाहीर केलेल्या दराप्रमाणे म्हणजे ६३० रुपये क्विंटल फरक १० रुपये असा ६९० रुपये क्विंटल भाव केळीला मिळायला सुरुवात झाली आहे. आगामी काळात बाजारपेठेची स्थिती आणखी सुधारून उत्पादन खर्च भरून निघण्याइतका भाव केळीला मिळेल अशी, अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. 

उद्यापासून बऱ्हाणपूरचे लिलाव सुरू 
येथून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीत केळीचे लिलाव लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बंद होते. ते उद्या (ता. २०) सोमवारपासून सुरू होणार असल्याचे तेथील बाजार समितीने जाहीर केले आहे. बऱ्‍हाणपूर येथील केळी भावाचा परिणाम रावेर आणि जळगाव जिल्ह्यातील केळी भावावर होतो. बऱ्हाणपूरला लिलाव सुरू झाल्यामुळे येथील केळी भावातही वाढ होईल आणि मागणीही वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver banana transport arab country