esakal | कोरोना‘च्या प्रभावातही केळी निर्यात सुरळीत
sakal

बोलून बातमी शोधा

banana transport

कोरोना‘च्या प्रभावातही केळी निर्यात सुरळीत

sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : कोरोनामुळे इराक, इराण, चीनसह आशिया व युरोपात हाहाकार उडाला असला, तरीही देशातील केळी निर्यातीवर त्याचा परिणाम झालेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, इंदापूर (जि. पुणे) भागातून आठवड्याला २० तो २२ कंटेनर्स केळी निर्यात होत आहे. आगामी काळात जिल्ह्यातील केळीही इराक, इराण आणि अरब देशांत निर्यात होण्याच्या प्रतीक्षेत असून, यामुळे जिल्ह्यातील निर्यातदार केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 


गुणवत्तापूर्ण आणि निर्यातक्षम केळीचा पुरवठा अरब देशांत करता येईल एवढी केळीच कापणीसाठी जिल्ह्यात तयार नसल्याने मागणी असूनही केळी उपलब्धतेअभावी या संधीचे सोने काहीसे उशिरा होणार आहे. त्यात जगात खळबळ माजविणाऱ्या कोरोनाचा प्रभाव इराण, इराकमध्ये वाढला आहे. याच भागांत खानदेशी केळीला आगामी पंधरवड्यापासून मोठी बाजारपेठ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, कोरोनाच्या बातम्यांमुळे निर्यातदार केळी उत्पादक शेतकरी चिंतेत होते. 

चार देशात निर्यात 
सध्या जिल्ह्यातून निर्यातीला वेग आलेला नसला तरीही पश्चिम महाराष्ट्रातून तीन ते चार निर्यातदार कंपन्या निर्यात करीत आहेत. कोल्हापूरच्या एकदंत बनाना एक्सपोर्ट्सचे संचालक प्रमोद चौगुले यांनी टेंभुर्णी (जि. सोलापूर) येथून ‘सकाळ'शी बोलताना सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर आणि टेंभुर्णी परिसरातून आठवड्याला सुमारे २० ते २२ कंटेनर्स केळी आखाती देशांत विशेषतः इराक, इराण ओमान, अफगाणिस्तान या देशांत निर्यात होत आहे. कोरोनामुळे तिथून ऑर्डर रद्द झालेली नाही किंवा तशी शक्यताही नाही. 
कोरोनामुळे केळी निर्यातीवर कोणताच परिणाम होणार नसल्याचे मत केळीतज्ज्ञ के. बी. पाटील यांनी ‘सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. श्री. पाटील म्हणाले की, यावर्षी कापणीयोग्य आणि निर्यातक्षम केळी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. या पंधरवड्यात केळी निर्यातीला वेग येईल आणि कोरोनाचा कोणताही परिणाम जाणवणार नाही. 


व्हायरल क्लिप'चा फायदा 
कोरोना या संसर्गजन्य रोगावर केळी रामबाण उपाय असल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत असल्याने, केळीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीनसलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा हवाला देऊन या क्लिपमध्ये केळीत प्रतिकारशक्ती वाढविणारे घटक असून, बी-६ हे जीवनसत्त्व आहे. केळी खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढून कोरोना होण्याची शक्यता नसल्याचे या व्हिडिओ क्लिपमध्ये सांगण्यात येत आहे. ‘रोज एक केळे खा आणि कोरोनापासून दूर रहा‘, असे या क्लिपमध्ये सांगण्यात येत आहे. 
 

loading image
go to top