esakal | केळी निर्यात बंगाली कामगारांवर अवलंबून; कामगार घरी गेल्यास निर्यात घटणार
sakal

बोलून बातमी शोधा

banana transportation

जिल्ह्यातील व रावेर तालुक्‍यातील केळी निर्यातीला गेल्या तीन- चार वर्षांपासून गती आली आहे. तालुक्यात व जिल्ह्यात दर्जेदार, निर्यातक्षम उत्पादन होत आहे; परंतु कापणीनंतरच्या केळीची हाताळणी करताना होणाऱ्या असंख्य चुकांमुळे निर्यातीत अडथळे निर्माण होत होते.

केळी निर्यात बंगाली कामगारांवर अवलंबून; कामगार घरी गेल्यास निर्यात घटणार

sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : सध्या तालुका व जिल्ह्यातून अरब देशांमध्ये सुमारे दोन हजार क्विंटल केळीची निर्यात रोज होत आहे. ही निर्यात पश्चिम बंगालमधून आलेल्या अडीचशे कुशल केळी कामगारांवर अवलंबून आहे. मात्र यातील काही कामगारांना ईदपूर्वीच घरी जाण्याची ओढ लागली असून, स्थानिक कामगारांना यापुढे कुशल होण्याची आवश्यकता दिसून येत आहे. 

आवर्जून वाचा - आमदारकीसाठी कोल्हापुरातून पुण्याला कोण गेले? : एकनाथराव खडसे

जिल्ह्यातील व रावेर तालुक्‍यातील केळी निर्यातीला गेल्या तीन- चार वर्षांपासून गती आली आहे. तालुक्यात व जिल्ह्यात दर्जेदार, निर्यातक्षम उत्पादन होत आहे; परंतु कापणीनंतरच्या केळीची हाताळणी करताना होणाऱ्या असंख्य चुकांमुळे निर्यातीत अडथळे निर्माण होत होते. केळी कापल्यानंतर ती बॉक्‍समध्ये पॅकिंग होईपर्यंत केळीला कुठे बाहेरून धक्का लागला, घासली गेली तर पिकल्यानंतर केळी तिथे काळी पडते आणि विदेशात अशी काळी पडलेली केळी रिजेक्ट केली जाते. म्हणून निर्यातीसाठी अत्यंत काळजीपूर्वक आणि कौशल्याने केळीची हाताळणी करणाऱ्या बंगाली कामगारांना प्राधान्य दिले जाते. केळीचा एक कंटेनर म्हणजे सुमारे २० टन केळी कापून भरण्यासाठी साधारण २५ बंगाली कामगारांचे एक पथक काम करते. 

कौशल्यपूर्वक कामे 
केळीच्या झाडावरून कापणी केलेला घड काळजीपूर्वक खांद्यावर नरम गादीवर ठेवून कंटेनरपर्यंत आणणे, केळीच्या खालची वाळलेली काळी फुले काढून केळीच्या घडाच्या प्लास्टिक दोरीच्या साह्याने फण्या वेगवेगळ्या करणे, या फण्या आधी स्वच्छ पाण्याने आणि नंतर बुरशीनाशक पाण्याने धुणे, या फण्यांचे १३ किलो याप्रमाणे बॉक्‍समध्ये पॅकिंग करणे आणि शेवटी कागदी बॉक्समध्ये केळी ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतील हवा काढून घेऊन बॉक्स पॅक करणे ही सर्व कामे हे कुशल मजूर उत्कृष्टपणे करताना दिसून येतात. 

पॅकिंगचा खर्च मोठा 
बंगालमधील हे कुशल कामगार केळी निर्यातीसाठी पॅकिंग करताना साधारणपणे तीनशे रुपये क्विंटल अशी मजुरी घेतात. ही मजुरी काहीशी जास्त वाटत असली तरी त्यामागे त्यांची मेहनत, कष्ट आणि चिकाटीही असते. विदेशात केळी पोहोचल्यानंतर पॅकिंगमध्ये काही दोष आढळल्यास या कामगारांकडून पैसे वसूल करण्याची पद्धत असल्यामुळे हे कामगार प्रामाणिकपणे काम करताना दिसून येतात. 

घरची ओढ 
पश्चिम बंगालमधील कोलकता परिसरातील हे सर्व कामगार आहेत. यातील बहुतेक जण मुस्लिम असून, ईदपूर्वी घरी जाण्याची बहुतेकांची इच्छा आहे. हे कामगार जानेवारीपासून किंवा त्याआधी केळी निर्यातीसाठी सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात येतात. तेथील हंगाम संपल्यावर मार्चमध्ये जळगाव जिल्ह्यात येतात. जुलैपर्यंत ते काम करतात. वर्षातील किमान सात महिने ते महाराष्ट्रात राहतात. सध्या रावेर तालुक्यात तांदलवाडी, अटवाडे, रावेर, कुंभारखेडा आदी ठिकाणी बंगाली कामगारांची सुमारे दहा पथके म्हणजे २५० जण आहेत. ईदपूर्वी निम्मे कामगार घरी गेल्यास निर्यातीचे प्रमाणही कमी झालेले असेल आणि स्थानिक मजुरांची मदत केळी व्यापाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. 

सध्या तांदळवाडी (ता. रावेर) येथील स्थानिक मजुरांचे एक पथक निर्यातक्षम केळीच्या कापणी आणि पॅकिंगचे काम शिकले आहे. मात्र तालुक्यातील अन्य सर्वच मजुरांनी हे कौशल्य शिकावे आणि आणि निर्यातीला मदत करावी याची गरज आहे. यावर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे सोलापूर भागात अडकलेल्या या बंगाली कामगारांना जिल्ह्यात यायला जवळपास महिनाभर वेळ लागला. यामुळे निर्यातही उशिराच सुरू झाली. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील स्थानिक मजुरांनी हे कौशल्य शिकण्याची आवश्यकता आहे. 
 
बंगाली कामगारांची कामावरील निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. तसेच स्वीकारलेले काम ते काळजीपूर्वक करतात. त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्याची गरज नसते. 
- किशोर गनवाणी, संचालक, महाराष्ट्र बनाना एक्स्पोर्टस, रावेर 

बंगाली कामगार कंत्राटी पद्धतीने काम करीत असल्याने ते ठरवून दिलेल्या वेळेत नियोजित काम प्रामाणिकपणे करतात. 
- विजय फाळके, केळी निर्यातदार व्यापारी, बारामती, जि. पुणे 

loading image