कोरोना‘बाबत सोशल मीडियावर फेक न्यूज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

आज तालुक्यातील तापी किनारपट्टीतील धामोडी व कांडवेल येथे संशयित रुग्ण सापडल्याचे वृत्त झी २४ तासच्या स्क्रीनवर छेडछाड (पिक्चर मॉर्फ) करून सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे तालुक्यात मोठी चर्चा होती.

रावेर : सोशल मीडियावर कोरोना व्हायरसबाबत मोठ्या प्रमाणावर मेसेज येत आहेत. आज तालुक्यातील तापी किनारपट्टीतील धामोडी व कांडवेल येथे संशयित रुग्ण सापडल्याचे वृत्त झी २४ तासच्या स्क्रीनवर छेडछाड (पिक्चर मॉर्फ) करून सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे तालुक्यात मोठी चर्चा होती. मात्र, असे संशयित रुग्ण तालुक्यात नाहीत या अफवा आहेत. सोशल मीडियावर छेडछाड करणाऱ्यांवर व फेक न्यूज तयार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व तालुका वैद्यकीय अधिकारी शिवराय पाटील यांनी ‘सकाळ'ला दिली. 

हेपण पहा - "लालपरी'ला जडला "कोरोना व्हायरस'!

कोरोना व्हायरसचा फिवर संपूर्ण जगात सुरू आहे. संपूर्ण देशात व ग्रामीण भागातही याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मोबाईलच्या सोशल मीडियावर यासंदर्भात कोरोना वरील उपाय, त्यावरील व्यंग, हास्य मैफल यासह विविध मेसेज विविध व्हॉट्स अँप ग्रुपवर आणि फेसबुकवर येत आहेत. मात्र, आज सायंकाळपासून काही ग्रुपवर रावेर तालुक्यातील धामोडी येथील एक संशयित रुग्ण आढळला व कांडवेल येथे प्रवीण वानखेडे हा संशयित रुग्ण आढळला असा मेसेज झी २४ तास या वृत्तवाहिनीच्या ४ मार्चच्या स्क्रीनवर छेडछाड करून हा मेसेज व्हॉट्स ॲप ग्रुपवर टाकण्यात आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले व चर्चाही सुरू झाली. मात्र, यासंदर्भात प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . शिवराय पाटील यांच्याशी संपर्क केला असता रावेर तालुक्यात अशा प्रकारचा कोणताही रुग्ण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या वृत्ताच्या स्क्रीनवर चार मार्च ही तारीख असल्यामुळे झी २४ तासच्या स्क्रीनवर छेडछाड करून सदर स्क्रीनवर तयार करून अफवा असलेले मेसेज मोबाईलवरील व्हाट्सअपवर व्हायरल ज्यांनी केला असेल त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे प्रांताधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले . 

सोशल मीडीयावर कांडवेल व धामोडी येथे कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळल्याचे वृत्त निराधार आहे. ज्यांनी हे व्हायरल केले असेल त्यांच्याविरूद्ध उद्या (ता. १५ ) निंभोरा (ता. रावेर) येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 
डॉ. शिवराय पाटील, रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver corona virus social media fake news