"लालपरी'ला जडला "कोरोना व्हायरस'!

राजेश सोनवणे
रविवार, 15 मार्च 2020

"कोरोना व्हायरस'मुळे प्रवासी संख्या कमी झाल्याने उत्पन्नावर परिणाम होऊन रोजचा वीस लाख रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. मात्र पुणे मार्गावर रोजचे शेड्यूल सध्या तरी नियमितपणे सुरू आहे. 
- राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, रा. प. म. जळगाव विभाग

जळगाव : जगात पसरलेल्या "कोरोना व्हायरस'ने राज्यातही पाय पसरविण्यास सुरवात केली आहे. त्याची झळ साऱ्यांनाच बसत असून, राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) लालपरी अर्थात बसही यातून सुटलेली नाही. मागील पाच-सहा दिवसांपासून जळगाव विभागाला रोज वीस लाख रुपये तोटा होत असून, जणू "लालपरी'लाही "कोरोना व्हायरस' जडल्याचे दिसत आहे. 

क्‍लिक करा -coronavirus : कोरोनामुळे अजिंठा लेणी पडली ओस

"कोरोना व्हायरस'ने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. चीनमधून निर्माण झालेला "कोरोना व्हायरस' भारतात आला. यानंतर राज्यातही त्याचा प्रसार होऊ लागला असून, पुण्यात दहा संशयीत आढळून आले आहेत. मुळात खानदेशातील बहुतांश जण पुण्यात नोकरीनिमित्ताने वास्तव्यास असून, एकमेकांच्या संपर्कात आल्यास "कोरोना व्हायरस'ची बाधा होण्याची शक्‍यता आहे. या भीतीमुळे सर्वच बाजूंनी परिणाम जाणवू लागला आहे. यात प्रवासी वाहतूक करणारी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे राज्यात अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

हेपण पहा -व्हॉटस्‌ऍपच्या फोटोतल्या तिच्यासाठी त्याने दिले साडेचार लाख

एक कोटीचा फटका 
"कोरोना व्हायरस'च्या भीतीपोटी अनेकांनी बाहेरगावी येणे-जाणे टाळले आहे. त्याचा परिणाम राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहतुकीवर होत आहे. प्रवासी संख्या कमी झाल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. महामंडळाच्या जळगाव विभागावर गेल्या पाच-सहा दिवसांपासून प्रवासी संख्या कमी होण्याचा परिणाम जाणवत आहे. परिणामी, विभागाला रोज मिळणाऱ्या उत्पन्नात पंधरा ते वीस लाख रुपये उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे मागील पाच-सहा दिवसांत विभागाचे साधारण एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

 

फेऱ्याही घटणार 
पुणे, मुंबई येथे "कोरोना व्हायरस'चे रुग्ण आढळले. अशात जळगाव विभागाला सर्वाधिक उत्पन्न हे पुणे मार्गावर मिळते. परंतु पुण्यात "कोरोना'चे दहा रुग्ण आढळून आल्याने त्याचा परिणाम बसफेऱ्यांवर होण्याची शक्‍यता आहे. प्रवासी नसल्यास फेऱ्या रद्द होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon devision parivahan mahamandal bus impact corona virus