esakal | रावेरला आले छावणीचे स्वरुप; दंगलीत प्रौढाची हत्या 
sakal

बोलून बातमी शोधा

raver dangal

शहरात सुमारे सहाशे पोलिस अधिकारी, राज्य राखीव दलाचे जवान यांचा बंदोबस्त असून शहराला छावणीचे स्वरूप आले असून, सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. 

रावेरला आले छावणीचे स्वरुप; दंगलीत प्रौढाची हत्या 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रावेर : काल रात्री येथे उसळलेल्या दंगलीत येथील संभाजी नगर भागात राहणाऱ्या यशवंत रामदास मराठे (वय ५८ ) यांचा मृतदेह आज (ता. २३) सकाळी त्यांच्या राहत्या घरात नातेवाईकांना आढळून आला. दंगलखोरांनी तीक्ष्ण हत्याराने त्यांना मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, शहरात सुमारे सहाशे पोलिस अधिकारी, राज्य राखीव दलाचे जवान यांचा बंदोबस्त असून शहराला छावणीचे स्वरूप आले असून, सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. 
आज सकाळपासूनच शहरात जळगाव, धुळे आणि अमरावती येथून पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी दाखल झाले. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे हे येथे थांबून होते. रात्रभर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत काही संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. दिवसभर त्यांच्यावर सात विविध प्रकारचे गुन्हे नोंदवण्याची कारवाई सुरू होती. यात दंगल, जाळपोळ, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणे, खून करणे, सरकारी यंत्रणेस वेठीस धरणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. 

संचार बंदीची अंमलबजावणी 
आज सकाळपासूनच पोलिसांनी शहरातील विविध भागात गस्त घालून पोलिसांनी संचार बंदीची कडक अंमलबजावणी केली. विविध निमित्त सांगून बाहेर पडणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिस अधीक्षक डॉ. उगले यांच्याही रोषाला सामोरे जावे लागले. 

सकाळी आढळला मृतदेह 
येथील संभाजी नगर भागात राहणाऱ्या यशवंत रामदास मराठे (वय ५६) यांचा मृतदेह नातेवाईकांना त्यांच्या घरात आढळून आला. शहरात दगडफेक आणि जाळपोळ झाल्याचे वृत्त एकूण त्यांचे नातेवाईक गावातच अन्य नातेवाईकांकडे झोपण्यासाठी गेले होते. (कै) मराठे घरात एकटेच झोपले होते. त्यांचा हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने आणि दगडाने खून केल्याचे आढळून आले आहे. आज दुपारी एकच्या सुमारास शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह संभाजीनगर येथे घरी आणण्यात आला आणि पोलिस बंदोबस्तात मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी पत्रकार आणि पोलिस अधिकाऱ्यांकडे आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. प्रत्येक दंगलीत जाळपोळ आणि हल्ल्याला आम्हाला सामोरे जावे लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

विधवेचे घर जाळले 
मृत्युमुखी पडलेल्या मराठे यांच्या शेजारी राहणाऱ्या शोभाबाई भानुदास महाजन या विधवा महिलेचे घर समाजकंटकांनी काल रात्री तोडून जाळपोळ केली. श्रीमती महाजन यांना मुलगा नाही. त्यांच्या एका मुलीचा विवाह झाला आहे. त्या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून एकट्याच राहतात. दगडफेक सुरू झाल्यामुळे त्या जीव वाचवण्यासाठी शेजारच्या घरात आश्रयाला गेल्या असताना समाजकंटकांनी घराची कडी तोडून घरात प्रवेश केला व लाकडी पलंग, गादी व सामानाची जाळपोळ केली. लोखंडी कपाटासह भांड्यांची नासधूस झाली आहे. हल्लेखोरांनी आपल्या घरातून सात ग्रॅम सोने आणि मोलमजुरी करून गोळा केले वीस हजार रुपये लंपास केल्याचेही श्रीमती शोभाबाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. २०१२ च्या दंगलीतही शोभाबाई यांचे घर जाळले आणि लुटले गेले होते. 

छत्रपती शिवाजी महाराज चौकात शांतता 
काल रात्री प्रचंड दगडफेक आणि जाळपोळ झालेल्या छत्रपती शिवाजी चौकात पालिकेने आज सफाई करून दगड, विटा फुटलेल्या बाटल्या आदी गोळा करून स्वच्छता केली. संचार बंदीमुळे या भागात शांतता प्रस्थापित झाली असून अजूनही तणाव जाणवत आहे. 

दंगल पूर्वनियोजित 
काल रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर पोलिसांना खताच्या रिकाम्या पोत्यांमध्ये भरलेल्या दगडविटा आणि बाटलीत पेट्रोल भरून तयार केलेले पेट्रोल बॉम्ब घटनास्थळी दिसून आले. या चौकातील हायमास्ट लॅम्पच्या वायर्स देखील समाजकंटकांनी तोडून अंधार केला तसेच या भागातील ट्रांसफार्मरवरून होणारा वीजपुरवठा खंडित केला. यावरून ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. येथील आवजी सिद्ध महाराज मंदिरासमोर उभ्या असलेल्या कारची ही दंगलखोरांनी मोठमोठे दगड वापरून मोडतोड केली. 
दरम्यान, काल दगडफेकीत जखमी झालेल्या दोघांची प्रकृती सुधारत आहे. अन्य एक जखमीवर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी आज सकाळी परिस्थितीचा आढावा घेतला. प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी पाहणी केली. 
 
पोलिस महानिरीक्षकांची भेट 
दरम्यान, आज दुपारी नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी येथे भेट देऊन आढावा घेतला. त्यांनी घटना स्थळालाही भेट दिली. दंगलीची घटना अत्यंत वाईट आहे दंगलखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. यातून कोणाची सुटका होणार नाही, कारवाई करताना कोणावर अन्याय होणार नाही मात्र कोणाला माफही करण्यात येणार नाही अशी कडक भूमिका श्री. दोरजे यांनी घेतल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील सुमारे वीस जणांना ताब्यात घेण्यात आले असून, अटक करण्याची कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या दंगल प्रकरणी काही मोठे राजकीय मासेही गळाला लागतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.  

loading image