लढाई अस्तित्वाची... हॉटेल्स कामगारांची होतेय उपासमार

दिलीप वैद्य 
बुधवार, 8 एप्रिल 2020

मालकांनी नोकरांना, कर्मचाऱ्यांना त्यांच्या मजुरीचे पैसे काम बंद असतानाही द्यावेत. तरीही हॉटेल बंद राहील त्या किमान २१ दिवसांचा रोज मालक देणार नाही, अशीही भीती वेटर्स लोकांना आहे. 

रावेर : तालुक्यात रावेर आणि सावदा शहरात जवळपास सव्वाशे ते दीडशे छोटी-मोठी हॉटेल्स, चहा टपऱ्या आणि शीतपेयांची दुकाने आहेत. त्यातून जवळपास सहाशे ते सातशे वेटर्सना म्हणजे कामगारांना रोजगार मिळाला आहे. लॉकडाउनमुळे हॉटेल्सही बंद असल्यामुळे तालुक्यातील सर्व मिळून जवळपास बाराशे ते पंधराशे कामगार वेटर्स आता बेरोजगार झाले आहेत. रोज पैसे घरी नेल्यावर आपली उपजीविका चालविणाऱ्या या असंघटित कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. 

तालुक्यातील खिरोदा, चिनावल, निंभोरा, ऐनपूर, पाल, खानापूर, केऱ्हाळा यासारख्या मोठ्या गावांमध्ये हॉटेल्स आहेत. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यापासून, ऑर्डर घेणे आणि ग्राहकांना देण्यापर्यंत अनेक कामे केली जातात. या कामगारांना त्यांच्या कामाप्रमाणे साठ-सत्तर रुपयांपासून ते अडीचशे रुपयापर्यंत रोज मिळतो. दहा बारा वर्षांच्या पोरापासून ते साठी पार केलेले लोक नाइलाजाने वेटर्सचे काम करतात. जवळपास प्रत्येक हॉटेलमध्ये रोज सायंकाळी घरी जाताना वेटर्सना पैसे दिले जातात आणि त्यातूनच त्यांची उपजीविका चालते. मात्र, लॉकडाउंनचा फटका हॉटेल्स व्यवसायालाही बसला असून, वेटर हॉटेल मालकांकडे पैसे मागतात पण मालक देत नाहीत. कारण दिलेले पैसे बुडण्याची मालकांना भीती आहे. काही ठिकाणी मालकांना शंभर रुपये मागितले तर मालक हातात २५ रुपये ठेवतात आणि त्या बदल्यात मालकाच्या घरची छोटी-मोठी कामेही करावी लागतात. आणि हे तोकडे पैसे देताना परतीच्या बोलीवर किंवा कामातून कापून घेण्याची भाषा मालक करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केले आहे की, मालकांनी नोकरांना, कर्मचाऱ्यांना त्यांच्या मजुरीचे पैसे काम बंद असतानाही द्यावेत. तरीही हॉटेल बंद राहील त्या किमान २१ दिवसांचा रोज मालक देणार नाही, अशीही भीती वेटर्स लोकांना आहे. 

उपासमार होणार 
अनेक वेटर्सकडे रेशन कार्ड नाही. शासनाकडून मिळणारे सवलतीच्या किमतीत धान्य तरी मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यातील काही वेटर्स तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. या लॉकडाउनमुळे शेजारीपाजारी, मित्र आणि नातेवाईक देखील उधार पैसे देत नसल्याचा अनुभव जय बजरंग रेस्टॉरंटचे वेटर वसंत पाटील यांनी सांगितला. 

असाही मनाचा मोठेपणा 
येथील कौशल उपाहारगृह या हॉटेलमध्ये ५ जण कामाला आहेत. हॉटेल आणि काम बंद असले तरीही मालक हेमेन्द्र नगरिया या पाचही जणांना शक्य तितकी मदत करीत आहेत. पावसाळ्यात व्यवसाय मंदीत असताना देखील त्यांना रोज द्यावाच लागतो, मग आताही मदत करीत आहोत, दिलेले पैसे परत घेण्याचा विचारही मनात नसल्याचे श्री. नगरिया यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Raver Hotel workers are starving