Loksabha 2019 : प्रचाराला आल्या अन् मतदारांना जिंकले...! 

संजयसिंग चव्हाण
सोमवार, 15 एप्रिल 2019

रक्षा खडसे या सकाळी सहालाच मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी तयार होऊन प्रचारासाठी रवाना होतात. त्यांच्यासोबत आठ-दहा महिला कार्यकर्ते असतात. रक्षा खडसे यांना बहुतेक सर्वजण ‘ताई’ नावाने संबोधतात. आम्ही गाडीत बसलो. मुक्ताईचा जयघोष झाला. तोपर्यंत अन्य कार्यकर्ते इतर गाड्या घेऊन मागे तयारच. गुरुवारी (ता. ११) मलकापूरचा दौरा होता. दिवसभर त्या प्रचारानिमित्त फिरल्या. मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या अन् त्यांनी प्रचारादरम्यान मतदारांची मने अक्षरशः जिंकली... 

रक्षा खडसे या सकाळी सहालाच मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी तयार होऊन प्रचारासाठी रवाना होतात. त्यांच्यासोबत आठ-दहा महिला कार्यकर्ते असतात. रक्षा खडसे यांना बहुतेक सर्वजण ‘ताई’ नावाने संबोधतात. आम्ही गाडीत बसलो. मुक्ताईचा जयघोष झाला. तोपर्यंत अन्य कार्यकर्ते इतर गाड्या घेऊन मागे तयारच. गुरुवारी (ता. ११) मलकापूरचा दौरा होता. दिवसभर त्या प्रचारानिमित्त फिरल्या. मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या अन् त्यांनी प्रचारादरम्यान मतदारांची मने अक्षरशः जिंकली... 

विदर्भातील जनतेबद्दल बोलताना ताई सांगतात, की येथील जनता खूप प्रेमळ, मदतीसाठी व पाहुणचारासाठी प्रसिद्ध आहे. ताईंना त्यांच्या दिनचर्येबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या, की सध्या तर रात्री झोपते केव्‍हा, हेच माहीत नसते. दिवसाची सुरवात मात्र पहाटे साडेपाचला होत असते. सकाळी सहाला घराबाहेर पडते. सवड मिळाली तर एखाद्या कार्यकर्त्याकडे थोडा नाश्ता होतो. यावेळी खडसे व पाटील असे अख्खे सासर-माहेर प्रचारासाठी बाहेर पडले आहे. त्यात सासरे, सासू, माझी आई, बाबा, नणंदा, जेठाण्या, जावा, भाऊ, काका असे सर्वच्या सर्व प्रचारात सहभागी होत असल्याचे श्रीमती रक्षा खडसे यांनी सांगितले. 

‘जय गजानन’चा जयघोष 
मलकापूरमध्ये प्रवेश होताच, ‘जय गजानन’चा जयघोष झाला. गाड्यांचा ताफा गावात येताच ढोल-ताशांच्या गजरात स्वागत झाले. यानंतर प्रचाराला सुरवात झाली. यात दसरखेड, विवरा, रणगाव, बालगाव, दताळा, देवधाबा, खामखेड, जांभूळधाबा, वाटणी, उमाळी, माकनेर, घिर्णी बेलाड, बहापूर, वडोदा, हरसोडा, झोडगा, नरवेल, धरणगाव व पुढे मलकापूर, अशा विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. जामखेड येथे एका कार्यकर्त्याच्या मळ्यात मिरची डाळ व पोळी असा वैदर्भीय ‘मेनू’ होता. जेवणानंतरही आराम नाही. ताई लगेच पुढच्या प्रवासाला निघाल्या. दिवसभर शंभर- सव्वाशे किलोमीटरचा प्रवास करून रात्री आठला मलकापूरला पोहोचल्या. तेथे रॅली व सभा आटोपून कार्यकर्त्यांच्या भेटी, बंदद्वार चर्चा हे सर्व उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, रात्रीच्या जेवणामध्ये पुरी, आंब्याचा रस, कांदा भाजी असा ‘मेनू’ होता. 

नाथाभाऊंच्या पुण्याईने अडचणी दूर 
सासरे एकनाथराव खडसेंबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या, बाबा दररोज फोन करून प्रचाराचा आढावा घेत असतात. अडचणींवर उपाय सांगतात, ते माझे आधारस्तंभ आहेत. ते प्रचारात सक्रिय नसल्यामुळे माझ्यावर साहजिकच ताण आला आहे; परंतु कार्यकर्ते मला तशी उणीव भासू देत नाहीत. शिवाय गेल्या वर्षाचा अनुभव आहे. मी मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवण्याचा मला फायदा होत आहे. रक्षा खडसे कोण आहे, हे सांगावे लागत नाही. नाथाभाऊंची पुण्याई एवढी आहे, की माझ्या अडचणी चुटकीसरशी दूर होत असल्याचे त्या म्हणाल्या. 

मोठी मुलगी समजदार 
प्रचाराची रणधुमाळी अत्यंत व्यस्त दिनक्रमात मुलगी क्रिषिका व गुरुनाथ यांचा सांभाळ कसा करतात, या प्रश्नावर रक्षा खडसे म्हणाल्या, की गुरुनाथ पहिलीत आहे. त्याला फारसे कळत नाही; परंतु माझी लेक कृषिका पाचवीत आहे. ती समजदार आहे. रात्री फोन येतो. तिला माहिती आहे. आपली आई प्रचारात व्यस्त आहे म्हणून. दोन मिनिटे बोलणे होते. त्यांची इंटरनॅशनल स्कूल असल्याने जूनमध्ये त्यांना सुटी लागेल. मुंबई येथील आमच्या घरी माझ्या सासूबाई, माझी आई या दोन्ही मुलांची काळजी घेतात. त्यामुळे मला फारशी चिंता नसल्याचेही श्रीमती खडसे म्हणाल्या. 

दोन्ही पायांना फोडं अन् जखमा! 
प्रचार म्हटला, की दिवसभरात कमीत कमी शंभर किलोमीटरचा प्रवास व पंचवीस ते तीस किलोमीटर पदयात्रा, गाडीतून चढ-उतार अन् झोपदेखील पुरेशी नसते. जेव्हा जेवणाचीदेखील वेळ नसते. सर्व व्यस्त दिनचर्या व प्रचारामुळे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होणारच, रक्षा खडसे यांचेही तेच झाले. महिला असल्याने साडीवर स्पोर्ट शूज घालता येत नाही. ४५ अंश सेल्सिअस तापमान, त्यात पायात चप्पल यामुळे पायाला फोडं आले आहेत. त्यांनी औषधोपचारही घेतले; परंतु डॉक्टर म्हणतात, आराम करावा लागेल. मात्र, २३ एप्रिलपर्यंत आराम शक्य नाही. त्यामुळे आणखी दहा दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. 

बडेजावविना शिस्तबद्ध नियोजन! 
राजकारणात महिला केवळ कठपुतळी म्हणून असतात, अशी प्रत्येकाची धारणा असते. मात्र, यास भाजप- शिवसेना महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षा खडसे यांनी छेद दिला आहे. अत्यंत साधी राहणी, माजी मंत्र्यांची सून व विद्यमान खासदार असूनही कुठलाही बडेजाव न करता सर्वसामान्य घरंदाज महिलांप्रमाणे साध्या पोशाखात रक्षा खडसे, समवेत त्यांचा विश्वासू वाहनचालक अतुल पाटील हा कार घेऊन अगदी तयार... कुठे जायचे... कसे जायचे... कोणाला भेटायचे... याबाबतचे सर्व नियोजन तयार असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver loksabha one day with candidate raksha khadse