Loksabha 2019 : रावेर लोकसभेतून संतोष चौधरींची माघार 

संजयसिंग चव्हाण
सोमवार, 25 मार्च 2019

भुसावळ : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील रावेर मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. जागा कोणत्या पक्षाला सुटेल, यावरच घोडे अडलेले असताना संभाव्य उमेदवारांचीही मानसिकता आता नकारात्मक होत आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी त्यांच्या संभाव्य उमेदवारीपासून माघार घेतली आहे. 

भुसावळ, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, बोदवड, रावेर, जामनेर, मलकापूर, नांदुरा, असे 9 तालुके असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्र नांदुऱ्यापासून चोपड्यापर्यंत गृहीत धरले तर 125 किलोमीटरचे क्षेत्र आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रात प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. 
एकीकडे, भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीत मात्र जागेबाबतच संभ्रम आहे. कॉंग्रेसकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचे नाव चर्चेत आहे, त्यांनी काही महिन्यांपूर्वी तयारीही सुरू केली. मात्र, जागेचा तिढा सुटत नाही म्हटल्यावर त्यांची मानसिकता नकारात्मक झाली आहे. राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, अरुणभाई गुजराथी व माजी आमदार संतोष चौधरी यांची नावे चर्चेत होती. परंतु, जागा व उमेदवारीचे चित्र अद्याप अस्पष्ट असल्याने तयारी कुणी सुरू करायची, हा प्रश्‍न आहे. 

चौधरींची माघार 
या संभ्रमावस्थेत माजी आमदार चौधरी यांनी निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारीतूनच माघार घेतली आहे. खरेतर, संतोष चौधरी यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच घेतल्याचे मानले जात होते. मात्र, पक्षाकडून अद्याप कोणतेही संकेत न मिळाल्याने महिनाभरात संपूर्ण मतदारसंघ कसा पालथा घालणार, कशी तयारी करणार? या प्रश्‍नामुळे त्यांनी माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या निर्णयाने पक्षाला मोठा धक्का बसणार असून इतर इच्छुकांचा मार्गदेखील मोकळा झाला आहे. 
 
सुरवातीला रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मी इच्छुक होतो. परंतु, अद्यापही हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे की राष्ट्रवादीकडे राहतो, हे स्पष्ट झाले नाही. उमेदवारीही जाहीर नाही, अशा स्थितीत उमेदवारी करणे कठीण आहे. आपण उमेदवारी करणार नाही, हा निर्णय आठ दिवसांपूर्वीच पक्षाला कळविला आहे. 
- संतोष चौधरी, माजी आमदार. 

Web Title: marathi news raver loksabha santosh choudhary