Loksabha 2019 : तळपत्या उन्हातही चेहऱ्यावर हास्य अन प्रचारात "उल्हास' 

live photo
live photo

उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्‍यावर गमछा... नेहरू शर्ट आणि पायजमा असा साधा ग्रामीण वेष.. तळपत्या उन्हातही चेहऱ्यावर हास्य ठेवून प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस...दोन्ही हात जोडून मतदारांना आवाहन... त्यातच एखाद्याने आजाराची समस्या सांगितल्यास त्यांची आस्थेने अधिक विचारपूस, शक्‍य झाल्यास भ्रमणध्वनीवर "गोदावरी'तील डॉक्‍टरांशी चर्चा अन त्या रुग्णाचा उपचाराचीही सुविधा... लोकसभेतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी स्वाभिमानी व रिपाइं (कवाडे गट) आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा प्रचाराचा हा दिनक्रम.... 

सूर्यनारायणाचे नुकतेच आगमन झालेले.. वेळ सकाळी सहाची..स्थळ लोकसभेतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचे जळगावातील मू. जे. महाविद्यालय रस्त्यावरील भास्कर मार्केटमधील निवासस्थान... डॉ. पाटील यांचे विश्वासू सहकारी वाहनचालक सतीश गोरे हे कारसह (एमएच 19, डीडी 5054 ) सज्ज होते... निवासस्थानी निवडक सहकाऱ्यांसमवेत सकाळी सव्वासहाला चर्चा करून मतदारसंघातील नऊ "ब्लॉक'चा वैयक्तिक आढावा घेत, आपण कुठे कमी पडतोय का? यावर उपाययोजना सूचना करीत जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांचे बारीक वाचन करीत डॉ. पाटील राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी मोबाईलवर बोलत होते. डॉ. पाटील यांची कार निघते विदर्भाकडे. अर्थात, आज (12 एप्रिल) मलकापूर व नांदुरा या दोन तालुक्‍यांतील बूथप्रमुखांचे मेळावे होते. सकाळी नऊला निघालेली कार भुसावळमार्गे साडेदहाला मलकापूर येथील येथील भातृ मंडळात पोहोचली. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशे व फटाक्‍यांच्या आतषबाजीत डॉ. पाटील यांचे स्वागत करण्यात आले. 
यावेळी कार्यकर्त्यांची संख्या व उत्साह पाहून डॉ. पाटील यांचा चेहरा खुलला. चौफेर भाषण करून मतदारांची मने त्यांनी जिंकली, तत्पूर्वी जांभूळधाबा, लोणवाडी, दुधलगाव, दाताळा, उसळी, वरखेड या गावांना भेटी दिल्या. ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे यात सहभागी झाले होते. प्रवासादरम्यान डॉ. पाटील यांनी औपचारिक गप्पा करताना काही पैलू उलगडले. ते म्हणाले, पहाटे चारला उठून रात्री झोपायची वेळ निश्‍चित नाही. साडेचारला अंघोळ करून दिवसभराचे नियोजन काय? ते पाहून घेतो. सकाळी सहाला घरी जे तयार असेल ते जेवण करून घेतो. बाजरीची भाकर जेवणात आवर्जून असते. त्यामुळे नाश्‍ता वगैरे काही करत नसतो. नऊला घराबाहेर पडून दिवसभरात रस्त्याने कमी-अधिक शंभर किलोमीटरचा कारने प्रवास, प्रचारफेऱ्या 20 ते 25 किलोमीटर पायी रोज होत असतात. दुपारी तीनला कार्यकर्त्यांसोबत थोडा आहार घेतला. यात खमंग अशी शेवभाजी, चपाती, भात असा "मेनू' होता. जेवण आटोपल्यानंतर दिल्लीला राहुल गांधी यांच्या स्वीय सहाय्यकांशी भ्रमणध्वनीवरून भुसावळच्या सभेसंदर्भात चर्चा सुरू असताना, गाड्यांचा ताफा साडेचारनंतर नांदुऱ्याकडे निघाला. दरम्यान, उन्हाचा फटका बसू नये म्हणून कारचा एसी बंद करून डॉ. पाटील यांनी कानाला पांढरा गमछा गुंडाळला. त्यात एक लहान कांदा फोडून तो कानाला आवर्जून लावला. तासभरात उंच मारुतीचे दर्शन झाले व नांदुरा गाव आले. पुन्हा ढोल-ताशे व फटाक्‍यांच्या आतषबाजीत कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. पाय ठेवायला जागा नाही, येथून वाजतगाजत अजंता कार्यालयात नेत्यांची भाषणे, बूथप्रमुखाना मार्गदर्शन, शेरोशायरी डॉ. पाटील यांच्या भाषणाने समारोप झाला. सायंकाळचे साडेसातला येथे कार्यकर्त्यांच्या बसण्याची सोय होती. खास विदर्भी झणझणीत सावजी, त्यात मेनू मिरचीची डाळ, बट्टी, मठ्ठा, भात व कांदा, लिंबू यावर यथेच्छ ताव मारल्यानंतर सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून रात्री आठला डॉ. पाटील हे कार्यकर्त्यांसह जळगावकडे निघाले. रात्री उशिरा बंदद्वार चर्चा व नंतर थोडा फलाहार करून रात्री अकराच्या पुढे काहीच तास झोप व पुन्हा तीच दिनचर्या, असा अनुभव पाहायला मिळाला. यावेळी डॉ. पाटील म्हणाले, पहाटे चारला उठून रात्री झोपायची वेळ निश्‍चित नाही. त्यांना कंटाळा नाही. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही. हजारो मतदारांशी संपर्क साधला, तरी चेहऱ्यावर सतत स्मिहास्य, नकारात्मक शब्द त्यांच्या कोशातच नाही. सर्वांचे एकूण समाधान होईपर्यंत चर्चा व सर्वांना वेळ देणारा माणसांमधील माणूस आपला माणूस वाटावा, असे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. डॉ. पाटील यांना मिळणारा तरुणांचा प्रतिसाद, स्वयंस्फूर्तीने येणारे कार्यकर्ते व त्यांचा उत्साह पाहता प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर डॉ. पाटील हे आव्हान ठरले आहेत. 
 
मुलगी डॉ. केतकी यांच्याकडे दुपारची क्षुधाशांती! 

अत्यंत व्यस्त कार्यक्रमातही दुपारी साडेतीनला डॉ. पाटील यांनी लेकीचे घर गाठले. लेखक, डॉ. केतकी, डॉ. वैभव खर्चे हे प्रचारात होते. मात्र, त्यांचे व्याही अनिल खर्चे यांनी सरबराईत काहीच उणीव भासू दिली नाही. कलिंगड, लिंबू-पाणी अशी पाहुण्यांची व्यवस्था केली. डॉ. पाटील यांनी फ्रेश होऊन कपडे बदलले. विनासाखर अन्‌ दुधाचा चहा घेऊन डॉ. पाटील व त्यांचा ताफा नांदुऱ्याकडे रवाना झाला. 
 
अनाथ मुले अन्‌ उपचारांची जबाबदारी! 

नांदुरा येथील सभा आटोपल्यानंतर एक वृद्ध महिला चार लहान लेकरांना घेऊन आल्या. आईबाप नसलेल्या या मुलांची बलदेव चोपडे यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांचे शिक्षण व दररोजच्या खर्चाची जबाबदारी एका सक्षम कार्यकर्त्याकडे सोपवून दवाखान्यात उपचाराची सुविधा करून दिली. "गोदावरी'त डॉक्‍टरांशी संपर्क साधून त्यांची सही करून दिली. त्यांच्या या मदतीच्या हाताने या वृद्ध महिलेच्या डोळ्यांत अश्रू तरळले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com