esakal | चक्क...कोरोना बाधित मृत महिलेच्या अंगावरचे सोने लंपास !
sakal

बोलून बातमी शोधा

चक्क...कोरोना बाधित मृत महिलेच्या अंगावरचे सोने लंपास !

कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना काही निर्लज्जांकडून मात्र दागिन्यांची चोरी करणे हा प्रकार माणुसकीची सीमा ओलांडणारा असून अशा प्रवृत्तींना शासनाने गजाआड करणे गरजेचे आहे.

चक्क...कोरोना बाधित मृत महिलेच्या अंगावरचे सोने लंपास !

sakal_logo
By
धनजंय सोनवणे

साक्री ः कोरोना सारख्या महामारीच्या काळात संपूर्ण जग एकमेकाला साहाय्य करत असताना, आधार देत असताना, मृताच्या अंगावरील सोने लंपास करण्याचे लांच्छनास्पद कृत्य रुग्णालयात घडले. ही घटना साक्री येथील सुतारगल्ली परिसरातील ६५ वर्षीय मृत महिलेच्या बाबतीत घडल्याने या घटनेची निंदा केली जात आहे. तर सोने कोणी लंपास केले याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही केली जावी, तसेच कुटुंबीयांना ते दागिने परत केले जावेत, अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांसह भाजपच्या शिष्टमंडळाने पोलिसांना निवेदन देत केली. 

शहरातील सुतारगल्ली परिसरात राहणाऱ्या ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांच्यावर धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान ११ जुलैला त्यांचे निधन झाले. नियमानुसार धुळे येथेच त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. याप्रसंगी त्यांचा मुलगा व अन्य दोन नातेवाईक उपस्थित होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी घाईघाईत त्यांना त्यांच्या आईचे मुखदर्शन केले. त्यावेळी नातेवाइकांनी आईच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत, कानातील बाया व नाकातील नथ आदी सोन्याचे दागिने कुठे गेले अशी विचारणा कर्मचाऱ्यांकडे केली परंतु त्यावेळी कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ करत वेळ मारून नेली. 

मात्र अनेक दिवस होऊनही कुटुंबीयांना महिलेच्या अंगावरील दोन तोळे सोन्याचे दागिने अद्याप मिळालेले नाहीत. या कुटुंबीयांची परिस्थिती अतिशय हलाखीची असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. अशातच कोरोना सारख्या महामारीच्या काळात संपूर्ण जग एकमेकाला साहाय्य करत असताना, आधार देत असताना, मृताच्या अंगावरील सोने लंपास करणे लांच्छनास्पद कृत्य आहे. कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना काही निर्लज्जांकडून मात्र दागिन्यांची चोरी करणे हा प्रकार माणुसकीची सीमा ओलांडणारा असून अशा प्रवृत्तींना शासनाने गजाआड करणे गरजेचे आहे. या प्रकरणी सखोल तपास करावा व दागिने कुटुंबीयांकडे सुपूर्द करावे, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मृत महिलेचे नातलग, भाजपचे तालुकाध्यक्ष वेडू सोनवणे, पंचायत समितीचे माजी सदस्य उत्पल नांद्रे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, शहराध्यक्ष कल्याण भोसले, माजी सरपंच संजय पाटील, योगेश भामरे, विनोद पाटील आदींनी केली. 

 संपादन- भूषण श्रीखंडे

loading image