स्ट्रॉबेरीने साक्री तालुक्याला वेगळी ओळख 

भिलाजी जिरे
Sunday, 19 July 2020

स्ट्रॉबेरीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने मुलांचा शिक्षणाचा खर्च भागतो. संसारोपयोगी साहित्य, गरजेच्या वस्तू स्ट्रॉबेरी विक्रीच्या पैशातून घेता येतात. घरखर्च भागतो. 
-चुनिलाल श्रावण चौधरी, बारीपाडा 

वार्सा : परंपरागत शेतीसह आदिवासी बहुल साक्री (जि. धुळे) तालुक्यातील पश्‍चिमपट्ट्यात स्ट्रॉबेरीच्या लागवडीकडे कल वाढला आहे. उत्पादनानंतर आदिवासी शेतकऱ्यांनीच बाजारपेठ विकसित करत मिळकतीचा मार्ग शोधला आहे. ते प्रतिकिलो सरासरी ८०, तसेच १२० ते १६० दराने स्ट्रॉबेरी विक्री करतात. त्यामुळे साक्री तालुक्याला वेगळी ओळख स्ट्रॉबेरीने दिली आहे. 
पिंपळनेरच्या पश्र्चिमपट्टयात आदिवासी बहुल समाज आहे. आदिवासी शेतकरी पारंपरिक पिकासह नगदी पिकाकडेही वळू लागले आहेत. 
पश्‍चिमपट्ट्यात उडीद, चवळी, मूग, नागली, सावा, बरटी, भुईमूग, मका, भेंडी, अशी पारंपरिक बिजवाई आहे. त्यांची उगवणक्षमता कमी असली तरी सेंद्रिय शेतीवर आदिवासी शेतकऱ्यांचा भर आहे. उत्पादन कमी मिळेल; पण स्वाद चांगला असल्याने या मालाला चांगली मागणी आहे. हायब्रीडचे उत्पादन भरघोस मिळेल, पण चवीत फरक राहील, असे आदर्श बारिपाड्याचे प्रवर्तक चैत्राम पवार सांगतात. 
बारीपाड्यासह परिसरातील शेतकरी टरबूज, स्ट्रॉबेरी, पेरू, आंबावाडी, तांदळातील सुधारित जाती, भाजीपाला घेऊ लागले आहेत. स्ट्रॉबेरी गुंठ्यात, टरबूज एकरात, भाजीपाला गुंठ्यासह एकरात, आंबावाडी एकरात, पेरू एकरात अशा पद्धतीने पश्र्चिमपट्टयातील शेतकरी नगदी पिके घेताना दिसतो. 

स्ट्रॉबेरीच्या लागवडीवर भर 
पश्‍चिमपट्ट्यात स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे. या फळाला वैशिष्ट्यपूर्ण सुगंध, चमकदार लाल रंग, लज्जतदार पोत आणि गोड असल्याने मागणी असते. स्ट्रॉबेरीचा जाम, रस, आइस्क्रीम, मिल्कशेक आणि चॉकलेट्ससारख्या पदार्थांमध्ये वापर होतो. तसेच स्ट्रॉबेरीची चव कँडी, साबण, अत्तर आणि इतर बऱ्याच उत्पादनांमध्ये उतरविली जाते. 

शरीरासाठी उपयुक्त 
स्ट्रॉबेरी शरीरासाठी उपयुक्त फळ असल्याचा वैद्यकीय दावा असतो. या फळात पाण्याचे प्रमाण अधिक असते. सर्व वयोगटांतील व्यक्तींना, तसेच आजरपणात बालकांना ते उपयोगी ठरते. त्यास मागणी असल्याने पश्र्चिमपट्टयातील अनेक गावे, पाड्यातील शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करतात. प्रत्येक गाव-पाड्यात पाच ते दहा शेतकरी गुंठा ते दोन गुंठा या फळाची लागवड करतात. 

शेतकऱ्यांची भूमिका 
स्थानिक शेतकऱ्यांच्या मते स्ट्रॉबेरीमुळे प्रपंच भागतो व दरडोई उत्पन्न चांगले मिळते. रोजच्या विक्रीतून किराणा, दैनंदिन गरजा भागतात. स्ट्रॉबेरी तारणहार ठरली आहे. मोहगाव, शेंदवड, चावडीपाडा, बारिपाडा, मापलगाव, कुडाशी, हारपाड्यातील शेतकरी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतात. स्ट्रॉबेरीची स्थानिक बाजारपेठेत म्हणजे वार्सा, वार्सा फाटा, कुडाशी, पिंपळनेर, साक्री, धुळे, नवापूर, दहिवेल, निजामपूर आदी ठिकाणी विक्री होते. साक्री तालुक्यास लागून नाशिकचा काही भाग व जिल्ह्याच्या सीमेवरील गावांकडून स्ट्रॉबेरीला मागणी असते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sakri dhule strawberry production farmer and idanty