
धाडणे-शेणपूर शिवारात अवैधरित्या बनावट देशी दारू कारखाना सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांना मिळाली होती.
साक्री ः धाडणे – शेणपूर शिवारातील डोंगर टेकडी परिसरातील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या अवैध बनावट देशी दारू कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत बनावट दारूच्या बॉक्ससह सुमारे 26 लाख 59 हजार 954 रु. किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली असून, या प्रकरणी दुर्वेश भालचंद्र अहिरराव रा.धाडणे याच्यासह एकूण 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आवश्य वाचा- धुळ्यात परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची होणार कोरोना चाचणी
धाडणे-शेणपूर शिवारात अवैधरित्या बनावट देशी दारू कारखाना सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनात काल (ता.24) रात्री अकरा वाजेच्या सुमारास श्री.मैराळे यांच्यासह उपनिरीक्षक बी.बी.नऱ्हे, आर.व्ही.निकम, हवालदार एल.जे.वाघ, एस.डी.देशमुख, वाय.टी.शिरसाठ, के.एन.सोनवणे, डी.एम.विसपुते, व्ही.जे.पाटील, सी.डी.गोसावी, जी.जी.शिंपी आदीच्या पथकाने पंचासह या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी बनावट रसायन, स्प्रिट व बनावट देशी दारू तयार करण्याचे साहित्य मिळून आले.
आवश्य वाचा- पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे ७०० वर्षांपूर्वीचे हेमाडपंती मंदिराची झाली दुरावस्था
यात 7,59,000 रु.किंमतीचे रॉकेट देशी दारू नाव असलेले 253 बॉक्स, 3 लाख किंमतीचे स्प्रिरिटचे 15 प्लास्टिकचे ड्रम, 7,26,000 किंमतीची बनावट तयार केलेली दारू, यासह दारू तयार करण्यासाठी वापरत असलेले अन्य साहित्य, रिकाम्या बॉटल्स, ड्रम, मशीन्स, मोटर पंप, बॉक्स, 7 लाख किंमतीची महिंद्रा मॅक्सी ट्रक प्लस बोलेरो वाहन क्र.एम.एच.39, एडी 1113, 15 हजार किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी क्र.एम.एच.18, एजे 5562 यासोबतच 6 मोबाईल फोन, रिकामे प्लास्टिक ड्रम असा एकूण 26 लाख 59 हजार 954 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने यावेळी ताब्यात घेतला. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक आर.व्ही.निकम पुढील तपास करत आहेत. दरम्यान या कारवाईबाबत आज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी माहिती दिली. यापुढे देखील अवैध धंद्यांवर कारवाई सुरु राहणार असल्याचे सांगितले.
संपादन- भूषण श्रीखंडे