esakal | धुळ्यात परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची होणार कोरोना चाचणी  
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची होणार कोरोना चाचणी  

दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यांतून धुळे जिल्ह्यात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी केल्याचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

धुळ्यात परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची होणार कोरोना चाचणी  

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या राज्यांतून रेल्वे आणि रस्ते मार्गाने धुळे जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना विषाणूची चाचणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी संबंधित यंत्रणांना दिले. 
धुळे जिल्ह्यासाठी लॉकडाउनचा कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविला आहे.

आवश्य वाचा- राज्यपालांनी खडसेंना दिल्या यशाच्या सदिच्छा -
 

तसेच राज्य शासनाच्या २३ नोव्हेंबरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रात विमान, रेल्वे व रस्त्याने प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार २५ नोव्हेंबरपासून धुळे जिल्ह्यात रेल्वे व रस्त्याने प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर काही निर्बंध लागू केले. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यांतून धुळे जिल्ह्यात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी केल्याचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य आहे. रेल्वेने महाराष्ट्रात प्रवेश करण्याच्या ९६ तासांच्या आत आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने घेण्यात यावेत. ज्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल नसेल, अशा प्रवाशांची स्क्रीनिंग करून तापमान मोजावे. त्याची जबाबदारी रेल्वे विभागाची राहील. लक्षणे नसलेल्या प्रवाशांना घरी जाण्याची मुभा राहील. मात्र, लक्षणे असलेल्या प्रवाशांचे विलगीकरण करावे. त्यांची ॲन्टिजेन चाचणी करावी. निगेटिव्ह अहवाल असलेल्या प्रवाशांना घरी जाण्याची मुभा राहील. जे प्रवासी कोविड चाचणी करणार नाहीत किंवा बाधित आढळून आल्यास, अशा प्रवाशांना नियमानुसार जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. त्याबाबतचा खर्च संबंधित प्रवाशांकडून वसूल करावा, असे निर्देश श्री. यादव यांनी दिले. 

सीमेवर तपासणी पथक 
दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा राज्यांतून धुळे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग करून तापमान मोजण्यासाठी हाडाखेड (ता. शिरपूर), कोंडाईबारी (ता. साक्री) येथील सीमेवर तपासणी पथकाची (२४X७) स्थापना करण्याचे निर्देश संबंधित तहसीलदारांना दिले. लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा. ज्या प्रवाशांना लक्षणे आहेत, अशा प्रवाशांना माघारी जाण्याचा पर्याय असेल. लक्षणे असलेल्या प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आल्यास अशा प्रवाशांना प्रवासाची मुभा राहील. चाचणी न करणाऱ्या किंवा बाधितांना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. याबाबतचा खर्च संबंधित प्रवाशांकडून वसूल करावा. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी बजावले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image