esakal | खानदेशातील अर्थकारणाला बसणार ब्रेक; हे आहे कारण 
sakal

बोलून बातमी शोधा

break for the economy

यंदा कोरोनामुळे यावर्षी यात्रा भरली नाही, तर आगामी वर्षभर आर्थिक व्यवस्था कशी करावयाची असा प्रश्‍न व्यावसायिकांना पडला आहे. कोरोनाचा संसर्ग येत्या काही दिवसांत कमी झाला तर कार्तिकी नंतर भरणाऱ्या यात्रोत्सवांचा विचार होऊ शकेल.

खानदेशातील अर्थकारणाला बसणार ब्रेक; हे आहे कारण 

sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा (नंदुरबार) : कार्तिकी एकादशीनंतर यात्रांना सुरुवात होते. यात्रा हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या खानदेशातील लाखाहून अधिक व्यावसायिकांचे अर्थकारणावर यात्रांचा प्रभाव असून समाजव्यवस्था टिकवून ठेवणारा महत्त्वाचा घटक आहे. सद्य परिस्थितीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता असताना यात्रा भरणार की नाही याविषयी कोणीही नेमकेपणाने सांगू शकत नसल्याने याबाबत संभ्रम कायम आहे. 

यंदा कोरोनामुळे यावर्षी यात्रा भरली नाही, तर आगामी वर्षभर आर्थिक व्यवस्था कशी करावयाची असा प्रश्‍न व्यावसायिकांना पडला आहे. कोरोनाचा संसर्ग येत्या काही दिवसांत कमी झाला तर कार्तिकी नंतर भरणाऱ्या यात्रोत्सवांचा विचार होऊ शकेल. अन्यथा गर्दीमुळे संसर्ग पुन्हा पसरू नये यासाठी धोका न पत्करता यात्रोत्सव रद्द होऊ शकतो. 

अद्याप यात्रा संदर्भात बैठक नाही 
दरवर्षी कार्तिकीनंतर महिन्याभरात खानदेशातील सर्वांत मोठी यात्रा सारंगखेडा येथे भरते. यात्रे बरोबर गेल्या पाच वर्षापासून चेतक फेस्टिव्हल भरविला जातो. याच्या नियोजनासाठी तीन महिने अगोदरच जिल्हास्तरीय बैठक होत असते. कोरोनामुळे सारंगखेडा यात्रोत्सवानिमित्ताने कोणतीही बैठक आतापर्यंत झाली नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. येथील यात्रोत्सवाला साडे चारशे वर्षाची परंपरा आहे. येथे देशाच्या कानाकोपऱ्यांतुन घोडे खरेदी, विक्रीसाठी अश्वप्रेमी येतात. यात्रेत व्यापारासाठी देशभरातून व्यावसायिक येतात. यंदा कोरोनामुळे यात्रोत्सव होणार का याबाबत व्यापाऱ्यामध्ये संभ्रम आहे. 

खानदेशातील प्रसिद्ध यात्रा 
खानदेशात सारंगखेडासह विखरण, शिरपूर, आमळी, बोरीस, तळोदा, शिंदे, मंदाणे, मुडावद, बहादरपुर, अमळनेर, धुळे, चोरवड, वायपूर आदी ठिकाणच्या यात्रा प्रसिद्ध आहेत. याशिवाय नवरात्र , चैत्र महिन्यात एकवीरादेवी, पेडकाईदेवी, मनुदेवी, बिजासनीदेवी, धनदाईदेवी, इंदाशीदेवी, धनाई पुनाई देवी, आशापुरीदेवी, भटाईदेवी आदी देवींच्या यात्रा ही प्रसिद्ध आहेत. 
 
यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात जनसमूह एकत्र येतो. त्यामुळे संक्रमण वाढण्याची भिती असते. यात्रोत्सवाला परवानगी देण्यासाठी शासनाच्या निर्देशाचे पालन करावे लागेल. याबाबत शासन निर्णय घेईल. 
-मिलिंद कुळकर्णी, तहसीलदार, शहादा 

मार्च महिन्यापासून यात्रोत्सव, आनंदमेळा बंद झाल्यामुळे फिरते व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र वगळता गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात आनंद मेळा भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रात परवानगी देण्यात आलेली नाही. संघटनेमार्फत परवानगीसाठी मंत्रालयात निवेदन दिले आहे. 
- देवेंद्र चौधरी, अध्यक्ष, यात्रा व्यापारी संघटना 

संपादन ः राजेश सोनवणे