गुणकारी मध चाखताय जरा थांबा...आधी हे तपासा

रमेश पाटील
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

विक्रेते गावोगावी, गल्लीमध्ये फिरुन मध विकतांना दिसत आहेत. त्यामध्ये काही विक्रेते एका बादलीत साखरपाक, गुळ, उसाची काकवी तयार करतात . त्यात थोडया प्रमाणात मध टाकून ग्राहकांना मध म्हणून २५० ते ३०० रुपये किलोने विकण्याचे प्रकार सुरु आहेत. 

सारंगखेडा : अनेक आजारांवर 'मध' हा गुणकारी म्हणून ओळखता जातो. आयुर्वेदात मधाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे मधाच्या किमती मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. परंतू सध्या गल्ली बोळात, रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खुल्या मधामध्येही साखरपाक, गुळ भेसळ होत असल्याचे मोठया प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 
आठवडे बाजारात, गावात मध विकणारी टोळी मध विकतांना दिसून येतात. यातील अनेक जणांकडे चांगला मध असतो. मात्र काही विक्रेत्यांच्या मधात मोठ्या प्रमाणात भेसळ झालेली आढळते. डोक्यावर ठेवलेल्या पातेल्यात मध, त्यावर मधमाशांचे पोळे घेऊन हे विक्रेते गावोगावी, गल्लीमध्ये फिरुन मध विकतांना दिसत आहेत. त्यामध्ये काही विक्रेते एका बादलीत साखरपाक, गुळ, उसाची काकवी तयार करतात . त्यात थोडया प्रमाणात मध टाकून ग्राहकांना मध म्हणून २५० ते ३०० रुपये किलोने विकण्याचे प्रकार सुरु आहेत. 

हेपण वाचा - सावधान इंडिया, "क्राईम पेट्रोल'च्या प्रभावातून आर्शिनचा बळी

खरेदी केलेल्या मधात भेसळ असल्याचे माहीत झाल्यानंतर ग्राहकांना दाद कोणाकडे मागावी, याची चिंता आहे. कारण रस्त्यावर किंवा डोक्यावरून मधविक्री करणाऱ्यांना कुठे शोधावे, असा प्रश्न पडतो. भेसळयुक्त मध विकतांना भेट मधाचे पोळे समोर दाखवतात आणि ग्राहकांना भुरळ घालतात. 

चाखुनही कळत नाही. 
मध शुध्द असल्याचाच भास होतो . दरम्यान असा भेसळ युक्त मध ओळखणेसुध्दा दुरापास्त झाले आहे . अन्न व औषध प्रशासनाने यावर कारवाई करणे गरजेचे बनले आहे. असे मध विक्रेते मध चाखायला देतात, पण ग्राहकाला तो कसला आहे. हे ओळखता येत नाही. विश्वास बसावा म्हणून बाटल्या भरलेल्या ठिकाणी मधाचे पोळे ठेवलेले असते. त्या पोळयांवर जिवंत मधमाशाही असतात. त्यामुळे यावर ग्राहकांचा विश्वास बसतो. 

अशी ओळखा भेसळ 
शुद्ध मधात पाण्याचा अंश अत्यल्प असतो. त्यामुळे मधात कापूस भिजवून पेटवल्यानंतर तो आवाज न करता पेटतो. परंतू जर मधात भेसळ असेल तर तो कापसाचा बोळा पेटताना तडतड असा आवाज येतो. शुध्द मध सहजासहजी पाण्यात मिसळत नाही. तो पाण्यात मिसळण्यासाठी चमचाने ढवळावा लागतो. भेसळयुक्त मध ओळखण्याच्या अशा काही सोप्या पध्दती आहेत. त्यांचा प्रयोग करून रस्त्यावरील मध खरेदी करण्यास हरकत नाही.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sarangkheda market honey mixture froad