सावधान इंडिया, "क्राईम पेट्रोल'च्या प्रभावातून आर्शिनचा बळी

crime
crime

जळगाव : दूरचित्रवाहिनीवरील "सावधान इंडिया', "क्राईम पेट्रोल', सीआयडीसारख्या मालिकांचा प्रभाव किती घातक ठरू शकतो, त्याचा प्रत्यय या घटनेतून येतोय.. पिंप्राळा हुडकोतील आर्शिन या चारवर्षीय मुलीचा पाण्याच्या टाकीत बुडून झालेला मृत्यू हा या सीरियल्सच्या प्रभावाचा बळी आहे. मानसिक आजारी असलेली शेजारील बारावर्षीय सुभाना (काल्पनिक नाव) ही या मालिकांशिवाय दुसरं काहीच पाहत नव्हती.. त्यातूनच तिने आर्शिनला पाण्याच्या टाकीत बुडविले.. तिचा खोडसाळपणा आर्शिनचा जीव घेऊन गेला.. अर्थात, सुभानाची मानसिक अवस्था माहीत असूनही तिच्यावर वेळीच उपचार न झाल्याने हे अघटित घटल्याचेही आता बोलले जात आहे.

आर्शिनच्या मृत्यूचा विषय मंगळवारीच वादग्रस्त ठरला. नातलग व समाजबांधवांच्या आग्रहाखातर मृतदेहाचे "इनकॅमेरा' शवविच्छेदन करायचे ठरले. नंतर मृतदेह धुळे येथे नेण्यात आला. तत्पूर्वी, हळूहळू मृत्यूचे कारण स्पष्ट होत असल्याने एकामागून एक पुढाऱ्यांनी काढता पाय घेतला. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन होऊन मुलीवर अंत्यसंस्कार झाले. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आणि वैद्यकीय समितीकडून प्राप्त माहितीनुसार मृत आर्शिनच्या कपाळावर आणि मागे डोक्‍यावर जबर दुखापत झाल्याचे समोर आले. त्यानंतर खऱ्या चौकशीला पोलिसांनी सुरवात करून बारा वर्षीय विधीसंघर्षित सुभानानेच हे कृत्य केल्याचे निष्पन्न होऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीव्ही सिरीयल्स्‌चा प्रभाव
विधीसंघर्षित सुभाना ही "सावधान इंडिया', "क्राईम पेट्रोल', "सीआयडी' यासारख्या मालिकांशिवाय टीव्हीवर दुसरे काहीच बघत नसल्याचे पोलिसांनी खोदून काढले. सुभानाने एकदा संदल मिरवणुकीवर चौथ्या मजल्यावरून दगडफेक करत पळ काढला होता. खाली बसलेल्या एका महिलेच्या डोक्‍यात काठी फेकून ती लपून गेली होती. त्यानंतर घरात कुणासही काही न सांगता बेपत्ता झाली होती. तिच्या या खोड्या पाहता वडिलांना उपचारासह येथून घर बदलून घेण्याचा सल्लाही तेव्हा रामानंदनगर पोलिसांनी दिला होता.

मृत्यूच्या कारणासाठी "बुवाबाजी'
आर्शिनचा मृत्यू झाला.. त्यात शेजारील बारावर्षीय सुभानाचे नाव येत असल्याने तिच्या पित्याने भोंदूबाबाकडे बैठक बसवून अंर्तध्यानातून काय घडले असेल, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भोंदूबाबाने त्याला जिथे महापालिकेने तुमची घरे बांधली आहेत, ती जागाच मुळात "खट'आहे.. येथे खवीस, भूत-पिशाचाचे साम्राज्य होते. घडल्या प्रकारात "बला' तुझ्या परिवारावर होती.. मात्र, वेगळेच काही घडल्याचे विधीसंघर्षित बालिकेच्या अशिक्षित पित्याने पोलिसांना सांगताच त्यालाही प्रसाद खावा लागला.

असा झाला उलगडा..
सुभानाने आर्शीनला शेजारील भोई यांच्या घरात नेले, नंतर जिन्यात टाकून पळ काढल्याचे घटनेच्या दिवशीच स्पष्ट झाले होते. नंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने आणि क्राईम सिरीयल्स्‌च्या प्रभावातून तिच्या बाथरुममधील कपडे धुण्यात गुंग असल्याचा देखावा तयार केला.. तसेच संपूर्ण घर पाण्याने धुवून काढल्याने पोलिस आले तेव्हा घराची फरशी ओली होती. गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील, विश्‍वनाथ गायकवाड, संभाजी पाटील, गोपाल चौधरी यांच्या चौकशीत संशयाची सुई याच विधीसंघर्षित बालिकेवर होती. मात्र, ठोस पुरावे व प्रत्यक्षदर्शी नव्हते. वैद्यकीय अहवालानंतर उपनिरीक्षक कांचन काळे यांनी सुभाना व तिच्या पित्याची चौकशी केली.. मुलीला स्ट्रॉबेरी चॉकलेट आवडते, ते आणले. बराच वेळ काही न बोलणारी मुलगी चॉकलेट घेतल्यावर चक्क बोलू लागली. आर्शिन घरात असल्याचे तिने कबूल केले. मात्र, पुढचा किस्साच सांगत नव्हती. अखेर, तिचे आई-वडील, भावंडाची भीती दाखवली, नंतर आर्शिनसारखाच बाहुला तुला आणून देते असे सांगितल्यावर तिचे तोंड उघडले आणि कबुली जबाब नोंदवण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com