esakal | सारंगखेड्यात निषेध रॅलीतील जमावाकडून संशयिताच्या घरावर हल्ला 
sakal

बोलून बातमी शोधा

सारंगखेड्यात निषेध रॅलीतील जमावाकडून संशयिताच्या घरावर हल्ला 

प्रेमसंबंधाच्या नकारावरून अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची घटना घडली होती. शुक्रवारी रात्री अकराला पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी येथे विविध आदिवासी संघटनांनी शनिवारी भेट दिली.

सारंगखेड्यात निषेध रॅलीतील जमावाकडून संशयिताच्या घरावर हल्ला 

sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा  : विविध आदिवासी संघटनांतर्फे अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी दोषी नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (ता.२४) निघालेली रॅली संशयिताच्या घराजवळ येताच मोर्चेकरांनी त्याच्या घरावर हल्ला करीत घराचे नुकसान केले. घटनेनंतर संशयिताचे कुटुंब व नातेवाइकांनी गावातून इतरत्र आपले बस्तान हलविले. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. दरम्यान, चौदा मोर्चेकऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. 


सारंगखेडा (ता. शहादा) येथे शुक्रवारी (ता. २३) मध्यरात्री प्रेमसंबंधाच्या नकारावरून अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची घटना घडली होती. शुक्रवारी रात्री अकराला पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी येथे विविध आदिवासी संघटनांनी शनिवारी भेट दिली. सारंगखेडा तापी पुलापासून निषेध रॅलीला सुरुवात झाली. रॅली बाजार चौकातून पुढे जात असताना बाजार पेठेतील व ग्रामपंचायत चौकापर्यंत दुकानांवर दगडफेक करून संताप व्यक्त करण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून, चौकाचौकांत पोलिस बंदोबस्त आहे. दरम्यान, नुकसानप्रकरणी चौदा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

पोलिस अधीक्षकांची भेट 
घटनास्थळी शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी भेट देऊन पीडितेच्या कुटुंबांची भेट घेतली. सहाय्यक पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस निरीक्षक नजन पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नवले, पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे आदी उपस्थित होते. 


संशयितास पाच दिवसांची कोठडी 
या प्रकरणातील संशयित किशोर वडार यास शनिवारी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

संपादन- भूषण श्रीखंडे