माजी पर्यटन मंत्र्याच्या फॉर्म हाऊसवर आलाय नवा पाहूना; पण तो दिसताच का उडतात सर्वांचे होश ! 

रमेश पाटील  
Friday, 11 September 2020

आठवडयापासून नर जातीचा बिबट्या तापी काठावरील तापी व्हिलेज या फॉर्म हाऊसमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले जाते. या दोघांनी शेतशिवारात गुरे, बकऱ्यांना जखमी ही केले

सारंगखेडा ः तापी नदीच्या पात्रात ओथंबून भरलेले पाणी, निसर्गाने नटलेला परिसर, तापी व्हिलेजने निर्माण केलेले पर्यटनासाठीचे विशेष वातावरण असल्याने बिबट्याने सध्या तळ ठोकला आहे. जणू तो निसर्गाचा आनंद घेत आहे. व्हिलेजच्या फॉर्म हाऊस मालकांनी बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडे तक्रार केली आहे. 

यंदा कोरोना प्रादूर्भावामुळे पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. याचा फायदा चक्क बिबटयाने घेतल्याचे दिसत आहे. सारंगखेडा बॅरेजेच्या बॅक वॉटरमुळे तापी नदीच ओथंबून भरलेल्या पाण्याचा लाभ घेत टाकरखेडा (ता. शिंदखेडा) येथे तापी व्हिलेज असलेले माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दौलतगढ फॉर्म हाऊसची उभारणी केली आहे. ते पर्यटकांसाठी व छोट्या सहलीसाठीचे आवडते ठिकाण ठरले आहे. मात्र या ठिकाणी गेल्या आठवडयापासून चक्क बिबटयाने तळ टोकला असून तो निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आहे. तो वारंवार फॉर्म हाऊस कर्मचाऱ्यांच्‍या नजरेत येत असल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

कुठून आला बिबटया 
टाकरखेडा पासून काही अंतरावर वर्दे, चावळदे गावांचे शेतशिवार असून या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापूर्वी नर व मादी जातीचे दोन बिबटे शेतकऱ्यांचा नजरेत आले होते. त्यामुळे शेतात जाण्यासाठी भितीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आठवडयापासून नर जातीचा बिबट्या तापी काठावरील तापी व्हिलेज या फॉर्म हाऊसमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले जाते. या दोघांनी शेतशिवारात गुरे, बकऱ्यांना जखमी ही केले असल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले. 

बिबट्याला पकडण्याची प्रतीक्षा 
गेल्या पंधरा दिवसांपासून वर्दे व चावळदे (ता. शिंदखेडा) ते तापी व्हिलेज असा प्रवास करीत असलेल्या बिबट्यांना वन विभागामार्फत पिंजरा लावून जेरबंद करण्याची मागणी होत आहे. तत्काळ पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या बाबत माजी पर्यटन मंत्री श्री. रावल यांनी वन विभागाला सूचनाही दिल्या आहेत. 

आमच्या तापी व्हिलेजच्या फॉर्म हाऊसमध्ये बिबट्याचा वावर असून तो आमच्या कर्मचाऱ्याचा नजरेत आला आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाला माहिती दिली, परंतु अद्याप पिंजरा लावले नाही. 
-डॉ. सुभाष फुलंब्रीकर, संचालक, तापी व्हिलेज 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sarankheda Leopard free communication at former tourism minister Jayakumar Rawal's farm house