
वडिलांनी समज दिल्याने मुलीने किशोर यास संबंध ठेवण्यास नकार दिला होता. त्याचा राग येऊन त्याने तीक्ष्ण हत्याराने तिचा गळा कापून खून केला.
सारंगखेडा : प्रेमसंबंधाला नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह मध्यरात्रीच एका शेतात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेने एकच खळबळ उडाली. ही घटना गुरूवारी (ता. २२) मध्यरात्री घडली. पोलिसांनी तपासाला वेग देत संशयावरून मुलीच्या घरासमोरच राहणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. याबाबत त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सारंगखेडा (ता. शहादा) येथील भूत बंगला परिसरात राहणारी पंधरा वर्षीय मुलगी व तिच्या घरासमोर राहणारा किशोर शिवदार वडर यांच्यात प्रेम संबंध असल्याचा संशय मुलीच्या वडिलांना असल्याने त्यांनी किशोर वडर यास माझ्या मुलीशी संबंध ठेवू नको, तसेच बोलू नको अशी तंबी दिली होती. तरीदेखील किशोर हा तिच्या संपर्कात होता. वडिलांनी समज दिल्याने मुलीने किशोर यास संबंध ठेवण्यास नकार दिला होता. त्याचा राग येऊन त्याने गुरूवारी (ता. २२) रात्री साडेबारा ते पहाटे सहा दरम्यान तीक्ष्ण हत्याराने तिचा गळा कापून खून केला. तिचा मृतदेह शेजारील शरद बाबुलाल पाटील यांच्या शेतात फेकून दिला. ही घटना सकाळी तिचे कुटुंबीय उठल्यावर उघडकीस आली. घराचा मागील बाजूस अंगणात रक्ताचा सळा पडला होता. तिच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी नजन पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नवले, सारंगखेडा पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयिताचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचरण करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक डांगरे, फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासाची चक्रे फिरवली.
गोपनीय माहितीच्या आधारे संशयित ताब्यात
पोलिसांनी स्थानिक गोपनीय माहितीच्या आधारे किशोर वडर यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच घटनाक्रम पोलिसांना सांगितला. मुलीचा वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशोर वडर याच्याविरुद्ध सारंगखेडा पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे