नंदुरबार येथे सात लाखाचा गुटका जप्त 

धनराज माळी
Saturday, 12 December 2020

नंदुरबार शहरातील रामचंद्रनगर परिसरात एक व्‍यक्‍ती विमल,गुटका अवैधरीत्या विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली.

नंदुरबार : शहरातील रामचंद्रनगर परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटका विक्री करताना आढळून आल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ७ लाखांचा गुटका व ३ लाखांचे वाहन असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

नंदुरबार शहरातील रामचंद्रनगर परिसरात एक व्‍यक्‍ती विमल,गुटका अवैधरीत्या विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली. त्यानुसार कार्यवाहीसाठी त्यांनी पथक तैनात केले. एक इको कंपनीची राखाडी रंगाची गाडी (एम.एच.१५, एफ.एफ.७२४३) एका पत्राच्या शेडमध्ये उभी दिसली. त्याठिकाणी ओम गगनदास धनवानी हा गुटखाची चोरटी विक्री करताना मिळून आला व काही माल गाडीच्या बाजूला पडलेला दिसून आला. 

गाडी तपासणीनंतर
गाडीत बसलेल्या संशयितास ताब्यात घेऊन, त्याच्या ताब्यातील गाडीची व मालाची तपासणी केली असता, त्याच्याकडे गुटका मिळून आला. त्यामुळे त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७ लाख ५ हजार ७७८ रुपयांचा गुटका व ३ लाखाची चारचाकी असा एकूण १० लाख ५ हजार ७७८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात ओम गगनदास धनवानी (रा.सिंधी कॉलनी, नंदुरबार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news seven lakh gutka seized at nandurbar