अभनपूरवासियांच्या समस्येला ना अंत, ना उपाय! 

कमलेश पटेल
बुधवार, 1 जुलै 2020

गावातील नागरिक शेती व पूरक व्यवसाय करून उपजिविका भागवतात. गावात वीज आहे पण बेभरवशाची, तासनतास खंडित. सौर पथदिवे आहेत तेही बंद अवस्थेत. स्वतंत्र गावठाण फिडर नसल्याने फक्त आठ तास वीजपुरवठा होतो.

शहादा : अभनपुर हे तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील अडीचशे लोकवस्तीचे गाव. तोरखेडा (ता. शहादा) येथील ग्रामपंचायतीला हे गाव आहे जोडले आहे. परंतु गावांमध्ये आजही अनेकविध समस्यांचा डोंगर आहे. वीज, रस्ते, पाणीटंचाई हे जणू पाचवीलाच पुजलेले. जगावे तरी कसे असा प्रश्न विकासापासून कोसो दूर असलेल्या गावकऱ्यांना सतावतोय. 

गावातील नागरिक शेती व पूरक व्यवसाय करून उपजिविका भागवतात. गावात वीज आहे पण बेभरवशाची, तासनतास खंडित. सौर पथदिवे आहेत तेही बंद अवस्थेत. स्वतंत्र गावठाण फिडर नसल्याने फक्त आठ तास वीजपुरवठा होतो. त्यात कधी दिवसा तर कधी रात्री त्यामुळे ग्रामस्थांना आजही अंधारात रात्र काढावी लागते. इंदिरा आवास घरकुल योजनेपासून अनेक ग्रामस्थ वंचितच आहेत. दैनंदिन कामकाजासाठी पायपीट करत जावे लागते. गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची काम ही अपूर्णावस्थेत आहे. 
 
झिऱ्यातले अशुद्ध पाणी..... 
पाणीपुरवठ्यासाठी एक बोरवेल करण्यात आली आहे. परंतु गावठाण फिडर नसल्याने फक्त आठ तास वीजपुरवठा होतो. कधी दिवसा वीज असते तर कधी रात्री, त्यामुळे वीज असली तरच बोअरवेल चालू असते. याला पर्याय म्हणून ग्रामस्थ गावाच्या पायथ्याशी असलेल्या अभनपूर धरणाच्या झऱ्यातून पाणी भरतात. विशेष म्हणजे ३० ते ४० फूट खाली पायथ्याशी उतरून जीव धोक्यात टाकून हे पाणी भरावे लागते. त्यासाठी ग्रामस्थांनी स्वखर्चाने एक कुंडही तयार केले आहे. त्यातून अशुद्ध पाणी पिण्यासाठी वापरले जाते. 

पाणीपुरवठा योजना अपूर्ण 
२०१७-१८ या आर्थिक वर्षात ग्रामीण पेयजल कार्यक्रमांर्तत नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या कामास ३ वर्षे होऊनही काम अपूर्णावस्थेत आहे. हे काम मुदतीत पूर्ण न झाल्यामुळे गावकऱ्यांना आजही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तोरखेडा ग्रामपंचायतीने मुख्य कार्यकारी अधिकारींना निवेदन दिले आहे, त्यात हे काम कार्यारंभ आदेशातील अटी व शर्तीनुसार झालेले नाही. कामांत त्रुटी आढळून आलेल्या आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. योजना मुदतीत पूर्ण न केल्याने कामाचा दर्जा खालवला आहे. गावकरी दोन वर्षापासून दुष्काळी झळा सहन करीत असून नळ पाणी पुरवठा सुरळीत नाही. पाण्याची टाकीचे काम पूर्ण केले असून टाकीद्वारे पाणीपुरवठा सुरळीत नाही. हे काम २०१७-१८ पासूनचे असूनही गावास पिण्याचे पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार, यंत्रणेविरूध्द कार्यवाही करण्यात यावी. 

आमचा कुणीही वाली नाही, आजही आम्ही अनेक समस्यांनी जखडून गेलो आहोत. परंतु आमची कोणीही दखल घेत नाही. आजपर्यंत गावात साधी बसही आलेली नाही. 
- गिरजाबाई ठेलारी, 
 
गावातील समस्या सुटाव्यात यासाठी काय प्रयत्न करावेत हेच समजत नाही. कायमस्वरूपी वीज, पाणी मिळाले तरी भरपूर परंतु त्यासाठीही आम्हाला संघर्ष करावा लागत आहे. दैनंदिन कामकाजासाठी तोरखेडा येथे पायपीट करून जावे लागते. 
- शिवा वेच्या पावरा, ग्रामस्थ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada abhanpur village water road and light problem